केंद्रीय मंत्रीमंडळाने ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना करोना प्रतिबंधक लस देण्यासाठी परवानगी दिली आहे. एक एप्रिलपासून सुरु होणाऱ्या चौथ्या टप्प्यामध्ये ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. दरम्यान बॉलिवूड अभिनेता सलमान खानने सोशल मीडिया पोस्टद्वारे करोना प्रतिबंधक लस घेतल्याचे सांगितले. त्यानंतर सोशल मीडियावर त्याच्या पात्रतेसंबंधीन नेटकऱ्यांनी अनेक प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.

सलमानने ट्विटर अकाऊंटवर ‘आज मी करोना लसीचा पहिला डोस घेतला आहे…’ या आशयाचे ट्वीट करत करोना प्रतिबंधक लस घेतल्याचे सांगितले. त्यानंतर एका नेटकऱ्याने सलमानचे वय ६० वर्षां पेक्षा जास्त आहे की त्याला कोणता आजार आहे? असा प्रश्न विचारला आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने ६० वर्षां पेक्षा कमी वय असणाऱ्या व्यक्तींना करोना प्रतिबंध लस देणे अद्याप सुरु कलेले नाही असे म्हटले आहे.

पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य सेवा आणि करोना योद्ध्यांचे लसीकरण करण्यात आलं. त्यानंतर १६ फेब्रुवारीपासून ६० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांचं लसीकरण सुरु करण्यात आलं. त्यानंतर एक मार्चपासून ४५ हून अधिक वय असणाऱ्या पण इतर व्याधी असणाऱ्यांचे लसीकरण करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मंगळवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये करोना टास्क फोर्सचा सल्ला आणि वैज्ञानिक आधारांच्या सहाय्याने काही महत्वाचे निर्णय घेण्यात आलेत. त्यापैकी पहिला निर्णय म्हणजे ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व नागरिकांना करोनाची लस उपलब्ध होणार आहे, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

दरम्यान सलमानने आजच करोना प्रतिबंध लस घेतल्याचे सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितल्याने एकीकडे त्याला ही लस कशी देण्यात आली असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर दुसरीकडे त्याला कोणता तरी आजार आसावा म्हणून लस देण्यात आली असावी असे म्हटले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून सलमान त्याचा आगामी चित्रपट ‘राधे’च्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभूदेवा करत आहे. या चित्रपटात दिशा पटाणी, रणदीप हुड्डा आणि जॅकी श्रॉफ हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ईदला प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खानने चित्रपटाचे पोस्टर शेअर करत, ” ईदची कमिटमेन्ट दिली होती. ईदलाच येणार क्यू की एक बार जो मैने…” असे कॅप्शन दिले होते. चाहत्यांना दिलेले वचन पाळत असल्याचे त्याने या कॅप्शनमधून सांगितले होते.