बॉलिवूडचा भाईजान सलमान खान त्याचा आगामी ‘भारत’ हा चित्रपट घेऊन सज्ज झाला आहे. हा चित्रपट ५ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सलमान आणि कतरिना या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. त्यामुळेच काही दिवसांपूर्वी या दोघांनी कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी सलमानने चित्रपटाच्या प्रमोशनसोबतच अनेक विषयांवर चर्चा केली. यामध्ये त्याने त्याच्या बालपणीच्या आठवणींनादेखील उजाळा दिला. सलमान शाळेत असताना एका चुकीची शिक्षा सलीम खान यांना भोगावी लागली होती, ही आठवण त्याने यावेळी शेअर केली.

“शाळेत असताना एक दिवस मला अचानक माझ्या वर्गशिक्षकांनी दिवसभर वर्गाच्या बाहेर उभं राहण्याची शिक्षा केली. संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर मला घेऊन जाण्यासाठी आलेल्या वडीलांनी मला वर्गाच्या बाहेर उभं असल्याचं पाहिलं. मला पाहताच त्यांनी ही शिक्षा कशासाठी आहे ?असा प्रश्न विचारला. मात्र ही शिक्षा का केली आहे, हे मलादेखील माहित नव्हतं. त्यामुळे वडीलांनी सलीम खान यांनी शाळेच्या मुख्यध्यापकांची भेट घेतली. त्यावेळी शाळेची फी जमा नसल्यामुळे मला ही शिक्षा देण्यात आल्याचं मुख्यध्यापकांनी सांगितलं. ही ऐकल्यानंतर फी भरणं ही माझी जबाबदारी आहे आणि सलमानला वर्गात बसून शिक्षण देण्याची जबाबदारी तुमची आहे. चुक माझ्याकडून झाली आहे ना, मग शिक्षा याला का ? असा प्रश्न सलीम यांनी मुख्यध्यापकांना विचारला. त्यानंतर मधल्या सुट्टीपासून ते शाळा सुटेपर्यंत ते शाळेच्या आवारामध्ये उन्हात उभे होते”, असं सलमानने सांगितलं.

पुढे तो म्हणतो, “शिक्षा भोगून झाल्यानंतर वडीलांनी दुसऱ्या दिवशी शाळेची संपूर्ण फी जमा केली आणि विशेष म्हणजे झालेल्या प्रकाराबद्दल शिक्षकांनी माझ्याच वडीलांची माफी मागितली”.

दरम्यान, सलीम खान यांचं त्यांच्या तीनही मुलांसोबतच बॉण्डींग चांगलं असल्याचं कायमच दिसून आलं आहे. सुपर डान्सरच्या सेटवरही सलमानने त्याच्या आणि वडीलांच्या नात्यावर भाष्य केलं होतं. सलीम खान हे कधी वडीलांसारखे वाटले नाही, ते कायम आम्हाला मित्राप्रमाणे भासले. जेव्हा चुकलो तेव्हा कान उघडणी केली आणि जेव्हा चांगलं काम केलं तेव्हा कौतुकाने पाठही थोपटली, असं त्याने या मंचावर सांगितलं होतं.