प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सलमान खान लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. पण आपण निवडणूक लढवणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. इंदूर मतदारसंघातून सलमान लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याविरोधात निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. त्या चर्चेला ट्विटरद्वारे सलमान खाननेच उत्तर दिल्यानंतर पूर्णविराम मिळाला आहे.

ट्विटरवर सलमानने सांगितलं की मी निवडणूक लढवणार नाही किंवा कोणत्याच पक्षाचा प्रचार करणार नाही. सुमित्रा महाजन यांच्याविरोधात सलमानला मैदानात उतरवण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न चालू असल्याचं बोललं जात होतं.

सुमित्रा महाजन या इंदूरमधून सलग आठवेळा खासदार झालेल्या आहेत. त्यामुळे भाजपकडून ही जागा खेचून आणण्यासाठी काँग्रेसकडून कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी यापूर्वी सलमान खानचं नाव सुचवलं होतं. नुकतंच त्याला मध्य प्रदेश पर्यटन विभागाचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केलं होतं.

याआधी करिना कपूरला लोकसभा निवडणुकांच्या मैदानात उतरवण्याचा काँग्रेसचा इरादा असल्याचं बोललं जात होतं. मात्र करिनाने निवडणूक लढवण्याचा कोणताही विचार नसल्याचं स्पष्ट केल्याने सलमान खानच्या नावाची चर्चा होती.