वाल्मिकी समाजाबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने अभिनेता सलमान खान आणि शिल्पा शेट्टीला राजस्थान पोलिसांनी समन्स बजावले आहेत. राजस्थानच्या चुरु जिल्ह्यातील पोलीस उपअधीक्षक हुकुम सिंह यांनी हे समन्स बजावले आहेत. सलमान आणि शिल्पासोबत चित्रपट विश्लेषक कोमल नाहटा यांनाही समन्स बजावण्यात आले आहेत.

चित्रपट प्रमोशनदरम्यान एका टीव्ही कार्यक्रमात आक्षेपार्ह शब्द वापरल्याने वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप सलमान आणि शिल्पावर करण्यात आला आहे. याप्रकरणी गेल्या महिन्यात मुंबईतही दोघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. तर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. सलमानविरोधात दाखल झालेल्या तक्रारींवरुन आयोगाने केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, दिल्लीचे पोलीस आयुक्त आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडून उत्तर मागितले होते.

वाचा : डॉक्टर ते अभिनेता, असा आहे ‘मुक्काबाज’ विनीत कुमार सिंगचा प्रवास

‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सलमानने शिल्पाच्या ‘सुपर डान्सर २’ या रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमात स्वत:चे नृत्य कौशल्य कसे आहेत हे सांगताना सलमानने जातीवाचक शब्द वापरलेला. तर आपण घरी कसे दिसतो हे वर्णन करताना शिल्पानेही त्याच शब्दाचा पुनरुच्चार केला होता.