ईदच्या मुहूर्तावर अभिनेता सलमान खानचा ‘भारत’ हा बहुप्रतिक्षित व बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित झाला. मंगळवारी सलमानने बॉलिवूड कलाकारांसाठी या चित्रपटाच्या स्क्रिनिंगचं आयोजन केलं होतं. मात्र यावेळी चित्रपटगृहाबाहेर एका घटनेवरून सलमानचा पारा चढला आणि त्याने सुरक्षारक्षकाच्या कानशिलात लगावली.

चित्रपटगृहाबाहेर सलमान खानला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. अंगरक्षक व सुरक्षारक्षकांच्या घोळक्यातून पुढे जात असताना एका सुरक्षारक्षकाने चिमुकल्याशी गैरवर्तन केलं. हे पाहून ‘दबंग’ खानचा राग अनावर झाला आणि त्याने त्या सुरक्षारक्षकाच्या थोबाडीत मारले. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

वाचा : हवाई दलाच्या बेपत्ता विमानावरून वीणा मलिकचा मोदींना टोला, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल 

‘भारत’ या चित्रपटात सलमानसोबतच कतरिना कैफ, सुनील ग्रोव्हर, दिशा पटानी यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘भारत’ हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झालेल्या “Ode To My Father” या दक्षिण कोरियन चित्रपटावर आधारलेला आहे. अली अब्बास जफर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.