सुरज बडजात्या यांच्या आगामी ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटातून बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान बऱ्याच दिवसानंतर चित्रपटाच्या पडद्यावर दिसणार आहे. सध्या सलमान ‘प्रेम रतन धन पायो’मधील १३ मिनिटे लांबीच्या गाण्याच्या चित्रीकरणात व्यग्र असून यामध्ये तो फुटबॉल खेळताना दिसेल. 

सूत्रांच्या माहितीनूसार, या चित्रपटात एकूण ९ गाणी असून त्यामधील एक गाणे तब्बल १३ मिनिटे लांबीचे आहे. या गाण्याला हिमेश रेशमियांनी संगीत दिले आहे. याशिवाय, अहमद खान यांनी या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले असून कुर्ता आणि पायजमा परिधान केलेला सलमान या गाण्यात पहायला मिळेल. अभिनेत्री सोनम कपूर या गाण्यात सलमानबरोबर असून हे दोघेजण लग्नसमारंभात फुटबॉल खेळताना दिसतील. ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटाचे कथानक या गाण्याशी संबंधित असल्याचेही सांगण्यात येत आहे. चित्रपटातील जास्तीत जास्त गाण्यांसाठी राजश्री प्रॉडक्शन प्रसिद्ध आहे. त्यांच्या यापूर्वीच्या ‘हम आपके है कौन’ चित्रपटात १२ तर ‘हम साथ साथ है’ चित्रपटात ७ गाणी होती.