करोना विषाणूमुळे सध्या अनेकांवर आर्थिक संकट ओढावलं आहे. या काळात हातावर पोट असणाऱ्यांचे सर्वाधिक हाल होताना दिसत आहेत. त्यामुळे अनेकांना त्यांच्या मदतीचा हात पुढे केला आहे. यात काही कलाविश्वातील सेलिब्रिटींचाही समावेश आहे. अभिनेता सलमान खान सध्या विविध मार्गाने गरजुंपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच आता त्याने नाट्यकर्मींसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

काही दिवसापूर्वी सलमान खानने त्याच्या नव्या कंपनीत तयार करण्यात आलेले सॅनिटायझर मुंबई पोलिसांना दिले होते. पोलिसांच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी त्याने जवळपास १ लाख सॅनिटायझरचं वाटप केलं होतं. त्यानंतर आता तो पडद्यामागील कर्मचाऱ्यांसाठी पुढे आला आहे. त्याने श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह येथील नाट्यकर्मी आणि अन्य कर्मचाऱ्यांसाठी जेवणाची सोय केली आहे.

“श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह येथील नाट्यकर्मी आणि अन्य कर्मचारी यांच्यावर ओढावलेल्या परिस्थितीची माहिती आम्हाला मिळाल्यावर प्रथम आम्ही सलमान खानकडे धाव घेतली. विशेष म्हणजे आम्ही सलमान खानला ही परिस्थिती सांगितल्यानंतर ते लगेच मदतीसाठी तयार झाले. त्याने या कर्मचाऱ्यांसाठी अन्नधान्याची सोय केली. प्रत्येक पाकिटात त्यांनी पाच किलो तांदूळ आणि गव्हाचं पीठ, भाज्या, तेल, मीठ,मसाले आणि चहाची पावडर असं सामान दिलं. आम्ही पहिल्याच दिवशी हे सामान जवळपास १८६ गरजू कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवलं”, असं युवा सेनेचे सदस्य राहुल कनालने सांगितलं.

दरम्यान,आतापर्यंत अनेक कलाकारांनी गरजुंसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. यात सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, अमिताभ बच्चन या सारख्या कलाकारांच्या नावाचा समावेश आहे. विशेष म्हणजे अभिनेता सोनू सूद केल्या कित्येक दिवसांपासून गरजुंसाठी अहोरात्र मदत करत आहे.