सलमान खानच्या बहुचर्चित ‘ट्यूबलाईट’ या सिनेमाचे पहिले गाणे मंगळवारी रात्री रिलीज झाले आहे. सल्लूने त्याच्या ट्विटर हँडलवरुन ट्यूबलाईटमधील ‘द रेडिओ साँग’ शेअर केले. गाण्यात सलमान त्याच्या खास शैलीत नाचताना दिसत असून त्याच्या या गाण्याला चाहत्यांकडून चांगला प्रतिसादही मिळाला आहे.

सलमानच्या ‘ट्यूबलाईट’ या चित्रपटातील ‘द रेडिओ साँग’ मोठ्या दिमाखात रिलीज करण्यात आले. या कार्यक्रमाला दुबईतील सलमानचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. १९६० च्या दशकातील झलक या गाण्यात दिसते. या रेट्रो ट्रॅक सलमानने त्याच्या शैलीत नृत्य केले असून हे गाणेही सुपरहिट ठरणार असे दिसते. रेमो डिसूझाने हे गाणे कोरिओग्राफ केले आहे.

कबीर खान दिग्दर्शित ‘ट्यूबलाईट’ या सिनेमामध्ये सलमानसोबत चिनी अभिनेत्री झू झूसुद्धा झळकणार आहे. तिच्याशिवाय अभिनेता सोहेल खान, बालकलाकार माटिन रे तंगू, दिवंगत अभिनेते ओम पुरीसुद्धा या सिनेमात झळकणार आहेत. मुख्य म्हणजे बॉलिवूडचा किंग शाहरुख खानसुद्धा या सिनेमात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. लडाख आणि उत्तर भारतातील काही ठिकाणी या सिनेमाचे चित्रीकरण करण्यात आले आहे.