News Flash

‘कभी ईद कभी दिवाली’

सलमानच्या चाहत्यांना मात्र तो आपली गंमतच करतो आहे असे वाटते आहे.

(संग्रहित छायाचित्र)

‘कभी ईद कभी दिवाली’

कोणता चित्रपट करायचा हे ठरवण्याचा ताण कमी असतो की काय म्हणून तो चित्रपट पूर्ण होण्याआधीच तो प्रदर्शित कधी करायचा, याचा विचार त्या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणाऱ्या स्टार कलाकाराला, त्याच्या निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांनाही करावा लागतो. आता इतका ताण घेईल तर तो सलमान खान कसला? गेले वर्षभर त्याने २०२०च्या ईदला कुठला चित्रपट प्रदर्शित करायचा याचा काथ्याकूट करण्यात घालवला होता. काहीच हाती लागेना तेव्हा सरळ हाताशी प्रभुदेवाला धरत ‘राधे’ची घोषणा करून टाकली. आता हा राधे त्या आधीच्या राधेपेक्षा निदान सुसह्य़ असू दे.. असा धावा प्रेक्षकांचा आता कुठे सुरू झाला होता. तोवर सलमानने पुन्हा एकदा पुढच्या वर्षीच्या ईदचा चित्रपट जाहीर करून टाकला. त्याने चित्रपटाची घोषणा केली म्हणजे त्याच्या चाहत्यांना आनंदच व्हायला हवा खरे तर.. तसा तो झालाही आहे, पण त्याने जाहीर के लेल्या चित्रपटाचे नाव वाचून एकच गोंधळ सुरू झाला आहे.  सलमानने पुढच्या वर्षी ईदला ‘कभी ईद कभी दिवाली’ हा आपला चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर केले आहे. करण जोहरच्या ‘कभी खुशी कभी गम’च्या तालावर ठेवलेल्या नावाचा हा चित्रपट ‘हाऊसफुल्ल ४’ फेम दिग्दर्शक फरहाद सामजी दिग्दर्शित करणार आहे आणि साजिद नाडियादवाला याची निर्मिती असणार आहे. या नावामागची गंमत अजून तरी आपल्याला उलगडलेली नाही, सलमानच्या चाहत्यांना मात्र तो आपली गंमतच करतो आहे असे वाटते आहे. अनेकांनी त्याला ट्विटरवर भाई आप मजाक कर रहे हो ना.. अशा आशयाच्या पोस्ट्स टाकल्या आहेत. तर दुसरीकडे सलमानचा मित्र आणि सहकारी अक्षयकुमारने यातही आणखी गंमत शोधून काढली आहे. अक्षयने एकीकडे सलमानला त्याच्या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. खरे तर साजिद नाडियादवाला, फरहाद सामजी ही दोन्ही माणसे अक्षयच्याही तितक्याच जवळची आहेत. ‘हाऊसफुल्ल ४’चीच ही टीम असल्याने अक्षयने या तिघांना शुभेच्छाही दिल्या आहेत आणि या चित्रपटाच्या सिक्वलसाठीचे नावही सुचवले आहे. या चित्रपटाच्या सिक्वलसाठी ‘कभी ईद कभी ख्रिसमस’ असे नाव सुचल्याचे सांगत अक्षयने या तिघांचीही छान फिरकी घेतली आहे. आता नावाच्या चर्चेवरून सलमान आणखी काय विनोदी गोंधळ घालतो ते पाहायचे..

‘ला’जवाब !

बॉलीवूडमध्ये अभिनेत्रींचा लूक दर चित्रपटागणिक बोल्ड होत असेल तर त्यासंबंधी प्रत्येक जण आडाखे बांधायला लागतात. बोल्ड अवतार किंवा बोल्ड लूक हा फक्त जास्तीत जास्त मोठय़ा भूमिका मिळवण्यासाठी केला जातो, असा पूर्वापार समज इंडस्ट्रीत आहे. आणि त्यामुळे अशी कोणतीही अभिनेत्री बोल्ड लूकमध्ये वावरत असली की तिच्यावर या प्रश्नांची सरबत्ती केली जाते. अशाच प्रकारच्या प्रश्नांचा भडिमार सध्या अभिनेत्री दिशा पतानीवर होतो आहे. ‘एम. एस. धोनी : अनटोल्ड स्टोरी’, त्यानंतर ‘बागी २’ आणि गेल्या वर्षी ‘भारत’मधून थेट सलमान खानबरोबर रुपेरी पडद्यावर दिसलेल्या दिशाचा ‘मलंग’ हा आगामी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. प्रेमपटांचा बादशाह समजला जाणारा दिग्दर्शक मोहित सुरी याने ‘मलंग’चे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमधून दिशाचा बोल्ड अवतार लोकांसमोर आला आहे. याआधी ‘भारत’मध्येही ती बोल्ड लूकमध्येच वावरली होती. यानंतर ती पुन्हा एकदा सलमान खानची नायिका म्हणून ‘राधे’ या चित्रपटात दिसणार आहे. अर्थातच, तिच्या या बोल्ड लूकमुळे सध्या तिच्याकडे मोठमोठे चित्रपट आले असल्याची एकच चर्चा सुरू झाली आहे आणि तिलाही त्याविषयी जाहीरपणे विचारले जाते. अशा प्रश्नांना योग्य ती उत्तरे देणे हे बॉलीवूड नायिकांचे एक मोठे काम झाले आहे. दिशालाही दर चित्रपटागणिक अधिकाधिक बोल्ड होत जाणाऱ्या तिच्या लूकविषयी विचारण्यात आले. तेव्हा तिने इतके चपखल उत्तर दिले की त्यावर काही बोलणेच इतरांना अवघड होऊन बसले आहे. तिने या सगळ्याचे श्रेय तिच्या दिग्दर्शकांना देऊन टाकले आहे. ज्या ‘मलंग’ चित्रपटातील तिच्या बोल्ड लूकविषयी चर्चा सुरू आहे त्याबद्दल बोलताना तिने हे सगळे दिग्दर्शक मोहित सुरीमुळे शक्य झाल्याचे म्हटले आहे. तिच्या मते दिग्दर्शक ठरावीक एका पद्धतीने त्याच्या चित्रपटातील पात्रांचा विचार करत असतो. त्याच्या दृष्टिकोनातून ती व्यक्तिरेखा कशी असायला-दिसायला हवी हे ठरवले जाते. आणि मी दिग्दर्शकाच्या सूचनेबरहुकूम काम करणारी अभिनेत्री आहे. त्यामुळे त्याने दिलेल्या सूचनांनुसार मी माझी तयारी केली, असे तिने स्पष्ट केले आहे. आतापर्यंत ज्या भूमिका केल्या आहेत त्या इतरांच्या दृष्टिकोनातून, कल्पनेतून आलेल्या आहेत. मी फक्त त्यात उतरायचा प्रयत्न केला, असे खणखणीत उत्तर दिशाने दिले. त्यामुळे आता तिच्या बोल्ड लूकबद्दल तिला बोल लावण्यात काहीच अर्थ नाही. आणि तिच्या प्रत्येक दिग्दर्शकाला याबद्दल बोलणे किंवा कौतूक करणे दोन्हीही फारसे फलदायी नाही. एकूणच बॉलीवूडमध्ये फक्त बोल्ड असून चालत नाही. तर बुद्धिमानही असावे लागते आणि आपल्यात दोन्ही गुण आहेत हे दिशाने सिद्ध केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2020 4:42 am

Web Title: salman khan upcoming movie kabhi eid kabhi diwali abn 97
Next Stories
1 पुन्हा कलगीतुरा!
2 नाट्यरंग : झुंडबळी.. मीडियातला!
3 टेलीचॅट : रंगभूमीच्या ऋणात
Just Now!
X