बॉलिवूडाचा भाईजान सलामान खानचा ‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २ ऑक्टोबर पासून या चित्रपटाचे पुन्हा चित्रीकरण सुरु होणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे चाहत्यांना आनंद झाल्याचे दिसत आहे.

२ ऑक्टोबर रोजी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये सलमानच्या चित्रपटाचे शुटींग सुरु होणार आहे. त्यानंतर वांद्रे येथील मेहबूब स्टुडिओमध्ये पॅचवर्कचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. चित्रीकरणाच्या वेळी सरकारने आखून दिलेल्या नियांचे पालन करण्यात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राधे चित्रपटाच्या क्रू मेंबर्सची करोना चाचणी करण्यात आली आहे. या चाचणीमध्ये सर्वांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. तसेच सेटवर गेल्यावर पुन्हा करोनाची चाचणी करण्यात येणार आहे. यामध्ये अभिनेता आणि कोअर टीम असेल. एक व्हिडीओ शेअर करत सेटवर घेण्यात येणाऱ्या काळजी विषयी माहिती देण्यात आली आहे. सलमान सेटवर योग्य ती काळजी घेत असतो. सेटवर डॉक्टरांची एक टीम उपस्थित आहे.

काही दिवसांपूर्वी सलमानचा ‘राधे’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तसेच चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी निर्मात्यांनी २५० कोटींची मागणी केल्याची देखील चर्चा सुरु होत्या. पण या बाबत चित्रपट निर्माते किंवा सलमानकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.