बॉलीवूड दबंग खान सलमानची पूर्वाश्रमीची प्रेयसी सोमी अलीचे ती पाच वर्षांची असताना लैंगिक शोषण झाल्याची माहिती खुद्ध सोमीने एका मुलाखतीदरम्यान उघड केली आहे.
मूळची पाकिस्तानातील असलेल्या सोमी अलीच्या ‘नो मोअर टीअर्स’ (एनएमटी) संस्थेचा आठवा वर्धापन दिन साजरा झाला. यावेळी सोमीने इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत संस्था स्थापन करण्याचा उद्देश सांगितला. ती म्हणाली की, “मी पाच वर्षांची असताना घरातील नोकराने माझे लैंगिक शोषण केले होते. जेव्हा मला शाळा आणि विद्यापीठांमध्ये बोलण्याची संधी मिळाली तेव्हा मी हा प्रसंग विद्यार्थ्यांसोबत शेअर केला. यामुळे इतरांनाही अशा प्रसंगातून जावे लागले असेल तर त्यांना बळ मिळेल, त्यांनी स्वतःला दोष न देता मोकळेपणाने समोर येण्याची प्रेरणा मिळेल, अशी भावना त्या पाठीमागे होती.”
सध्या ‘एनएमटी’ संस्थेसाठी काम करत असलेल्या सोमीचे बॉलीवूड अभिनेता सलमान खानशी तब्बल आठ वर्षे प्रेमसंबंध होते. मात्र, सलमानच्या मद्यधुंद आणि रागीट स्वभावावरून दोघांमध्ये १९९९ साली ताटातूट झाल्याची चर्चा माध्यमांमध्ये होती. सलमानने रागाच्या भरात सोमीच्या डोक्यात शीतपेयाची बाटली फोडल्याचेही प्रकरण माध्यमांमध्ये चर्चेत होते. याबाबत सोमीला विचारले असता तिने सलमानची पाठराखण करत अशाप्रकराची घटना घडली असती तर, मी रक्तबंबाळ होऊन रुग्णालयात दाखल झाल्याचीही बातमी आली नसती का? असा सवाल उपस्थित करत वृत्त फेटाळून लावले. तसेच मी मद्यप्राशन केलेले सलमानला आवडले नसल्याने त्याने फक्त बाटली टेबलावरून खाली पाडली होती, असेही सोमीने यावेळी सांगितले.