सध्या संपूर्ण देशात करोना व्हायरचा वाढता संसर्ग पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मे पर्यंत लॉकडाउनची घोषणा केली. त्यामुळे सर्वजण घरात आहेत. कोणालाही घराबाहेर पडण्याची परवानगी नाही. कारणाशिवाय घराबाहेर पडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जात आहे. अशा परिस्थितीमध्ये बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे वडिल सलीम खान यांना मॉर्निंग वॉकला जाण्याची परवानगी कोणी दिली असा प्रश्न विचारला जात होता. आता खुद्द सलीम यांनी याचा खुलासा केला आहे.

मुंबई मीररने दिलेल्या वृत्तानुसार, ‘डॉक्टरांनीच मला दररोज चालण्याचा सल्ला दिला आहे आणि त्यासाठी मी सरकारकडून पास देखील घेतला आहे’ असे सलीम यांनी म्हटले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून सलीम खान वांद्रे येथे पक्षांना दाणे टाकत आहेत. आताच्या कठिण परिस्थितीमध्ये त्या पक्षांची काळजी आपणच घ्यायला हवी असे त्यांनी म्हटले आहे.

सलमानचे वडिल सलीम खान दररोज आपल्या मित्रांसोबत मॉर्निंग वॉकला जातात. सकाळी साडेआठ ते नऊ वाजेपर्यंत ते घराबाहेर फिरत असतात. जर नियम सर्वांसाठी सारखेच आहेत. तर पोलीस प्रशासन सलमानच्या वडिलांवर कारवाई का करत नाही? की केवळ ते सेलिब्रिटी आहेत म्हणून त्यांना लॉकडाउनचे नियम लागू होत नाहीत? असा प्रश्न वांद्रे येथील स्थानिकांनी सरकारला विचारला होता. आता सलीम खान यांनी सर्वांना उत्तर दिले आहे.