दहा वर्षांपूर्वी मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून पदपथावर झोपलेल्या चौघांना चिरडणारा अभिनेता सलमान खान याच्यावर निष्काळजीपणे गाडी चालविल्याच्या नव्हे, तर सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली खटला चालविणेच योग्य असल्याचा निर्वाळा देत सोमवारी सत्र न्यायालयाने सलमानला जोरदार दणका दिला. या आरोपामध्ये सलमान दोषी ठरल्यास त्याला दहा वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते.
दहा वर्षांनंतर आपल्यावर नवा आरोप ठेवून त्याअंतर्गत खटला चालविण्यास हिरवा कंदील दाखविणाऱ्या वांद्रे न्यायालयाचा निर्णय चुकीचा असल्याचा दावा करीत सलमानने त्याला सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. गेल्या महिन्याभरापासून कधी पावसामुळे तर कधी अन्य कारणामुळे लटकणारा सलमानच्या अपिलावरील निर्णय सोमवारी अखेर सत्र न्यायालयाने देत सलमानला ‘जोर का झटका’ दिला. वांद्रे न्यायालयाचा निर्णय योग्य असल्याचे नमूद करीत सलमानचे हे अपील फेटाळून लावले व सलमानविरुद्धच्या नव्या खटल्यासाठी १९ जुलै ही तारीखही न्यायालयाने निश्चित केली.
सकाळी अकरापासूनच अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू. बी. हेजिब यांनी सलमानच्या अपिलावर निकाल देण्यास सुरुवात केली. त्यानंतर सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास न्यायालयाने सलमानचे अपील फेटाळून लावत असल्याचे जाहीर केले. तसेच खटल्याची सुनावणी १९ जुलैपासून सुरू करण्याचे नमूद करीत तोपर्यंतच्या कालावधीत सलमान या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतो, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
सलमानविरुद्ध आतापर्यंत चालविण्यात आलेल्या खटल्यात बहुतांशी साक्षीदार तपासण्यात आले. मात्र घटना आणि खटला सुरू होऊन दहा वर्षे पूर्ण झाली, तरी सलमानविरुद्धचा खटला पोलिसांकडून हेतूत: केल्या जाणाऱ्या दिरंगाईमुळे लटकला असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी करीत त्याविरुद्ध वांद्रे न्यायालयात अर्ज केला होता.
त्यावर वांद्रे न्यायालयानेही सलमानला मद्यधुंद अवस्थेत गाडी चालविल्याने काय परिणाम होऊ शकतात याची जाणीव असतानाही गाडी चालविल्याचा ठपका ठेवत सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली त्याच्यावर खटला चालविण्यास मंजुरी दिली व प्रकरण फेरसुनावणीसाठी सत्र न्यायालयाल वर्ग केले.
नव्याने ठेवण्यात आलेल्या आरोपांमध्ये सलमान दोषी ठरल्यास त्याला दहा वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते.
सलमानने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आणि त्याचे अपील न्यायालयाने मान्य करून त्याला दिलासा दिला, तर त्याच्याविरुद्ध १९ जुलैपासून सुरू होणारा खटला चालणार नाही. आता सलमान सत्र न्यायालयाच्या निर्णयाला कधी आव्हान देणार हे येत्या दोन दिवसांत स्पष्ट होईल.