अभिनेता सलमान खान नेहमीच त्याच्या चाहत्यांच्या मनात घर करण्यात यशस्वी झाला आहे. त्याने साकारलेल्या प्रेमच्या भूमिकेपासून ते अगदी सुलतानपर्यंत प्रत्येक व्यक्तिरेखेच्या माध्यमातून हा दबंग खान प्रेक्षकांच्या मनावर नि:शंक छाप सोडतो. गेल्या बऱ्याच वर्षांपासून सलमानने विविध चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचे चित्रपट प्रेक्षकांमध्ये जितके लोकप्रिय आहेत तितकीच त्या चित्रपटातील गाणी आणि सलमानची अनोखी नाचण्याची शैलीही लोकप्रिय आहे.

सलमान खानचे एखादे प्रसिद्ध गाणे सांगा असे म्हटल्यावर अर्ध्या अधिक लोकांच्या तोंडून त्याचे ओ ओ जाने जाना याच गाण्याचे बोल बाहेर पडतात. अगदी सलमानचा भाऊ अभिनेता सोहेल खानलाही तसेच वाटते. एका कार्यक्रमामध्ये सोहेल खानने याबाबत सांगताना म्हटले आहे की, ‘आम्ही ज्यावेळी सलमानसोबत ओ ओ जाने जाना या गाण्याचे चित्रिकरण केले त्यावेळी अनेकांचे म्हणणे होते की, उघड्या अंगाने सलमान गाण्यात दिसत आहे म्हणूनच हे गाणे जास्त लोकप्रिय झाले आहे. पण, तसे नाहीये. किंबहुना या गाण्याच्या प्रदर्शनानंतर अनेक लहान मुलांनी दूध पिण्यास सुरुवात केली होती. अनेक लहान मुलांच्या आईंनी त्या चिमुकल्यांना सांगतले होते की, जर तुम्हाला सलमान खानसारखी बॉडी (शरीरयष्टी) हवी असेल तर तुम्ही दूध प्यायले पाहिजे.’

स्क्रिनवर शर्टलेस होण्यास सोहेलचा काहीही विरोध नाही. निर्माता-अभिनेता सोहेल थान याने स्वत:सुद्धा काही चित्रपटांमध्ये अशी दृश्ये देत पिळदार शरीर मिरवले आहे. या मुद्द्यावर विस्तारितपणे बोलताना सोहेल म्हणाला की, ‘आजच्या दिवसांमध्ये कोणत्याही अभिनेत्री किंवा अभिनेत्याने शरीरप्रदर्शन केले तर मी ती गोष्ट सकारात्मकपणेच घेतो. कारण एका अर्थी त्या सर्व गोष्टींचे अनुकरण लहान मुलेही करतात हे नाकारता येणार नाही. तुम्ही वाईट सवयींच्या साथीने चांगली शरीरयष्टी मिळवू शकत नाही. त्यामुळे जेव्हा संजय दत्त, सलमान खान, सुनिल शेट्टी, जॉन, बिपाशा बासू, दीपिका पदुकोण ज्यावेळी शरीरप्रदर्शन करतात त्यावेळी अनेकजण त्याचा संबंध बोल्डनेस आणि सेक्स अपिलसोबत जोडतात. पण, तुम्ही याचा दुसऱ्या बाजूने विचार करण्याची गरज आहे.’

सलमानप्रमाणेच सोहेल खानसुद्धा त्याच्या फिटनेसवर जास्त लक्ष केंद्रीत करत असतो. दरम्यान, ‘ट्युबलाइट’ या आगामी चित्रपटात सलमानसोबत सोहेल खानचीही महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. या चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या वेळचा सोहेलचा लूक काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर लीक झाला होता. या फोटोमध्ये सोहेल एका खाकी रंगाच्या लष्करी गणवेशात दिसत आहे होता. १९६२ मध्ये भारत आणि चीन दरम्यान झालेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे कथानक आधारलेले आहे. सलमानच्या चाहत्यांना या चित्रपटाविषयी आणि त्यांच्या भूमिकेविषयी उत्सुकता लागून राहिली आहे.