‘मेरे बारे में इतना मत सोचना दिल में आता हूँ समझ में हूँ’ हा सलमान खानचा ‘किक’मधला संवाद त्याच्या चाहत्यांनी अगदीच मनावर घेतलेला दिसतो. चित्रपट चांगला असो वा नसो ‘भाई’च्या चाहत्यांनी शुक्रवारी ‘किक’ प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटगृहात चांगली गर्दी केली. त्यामुळे ‘किक’ला ८३.८३ कोटी रुपयांचा पल्ला गाठता आला आहे. मात्र, १०० कोटींची किमया साधण्यासाठी सलमान अजूनही ईदच्या मुहूर्तावर अवलंबून आहे.
‘एक था टायगर’ हा सलमान खानचा आजवरचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट मानला जातो. गेल्या वर्षी बॉलीवूडमध्ये अशी कोटींची उड्डाणे करण्यात सलमान खानला अपयश आले होते. त्यामुळे २०१४ सालाची सुरुवात ‘जय हो’ चित्रपटाने करताना आपली लोकप्रियता पुन्हा तिकीटबारीवर कोटींमध्ये रुपांतरित होईल अशी अपेक्षा सलमान खानला होती. प्रत्यक्षात ‘जय हो’ हा चित्रपट अपेक्षेइतका व्यवसाय करू शकला नाही किंवा ‘दबंग’सारखा कमालीचा लोकप्रियही ठरला नाही मात्र, सलमानवरच्या त्याच्या चाहत्यांच्या अनाकलनीय प्रेमामुळे त्या सुमार चित्रपटालाही १०० कोटींचा आकडा पार करता आला. या तुलनेत साजिद नाडियादवालाचे पहिलेच दिग्दर्शन असलेल्या ‘किक’ने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली. ‘किक’ने पहिल्या दिवशी २६.४ कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला. शनिवारी हा आकडा वाढून २७.१५ कोटी रुपयांवर गेला तर रविवारी सर्वाधिक ३०.१८ कोटी रुपये गल्ला गोळा झाला. त्याच्यामुळे तीन दिवसांत या चित्रपटाला ८३ कोटी रुपयांपर्यंतचा व्यवसाय करता आला. मात्र, सलमान खानला आपल्याच चित्रपटाचा रेकॉर्ड अजूनही मोडता आलेला नाही. ‘एक था टायगर’ या चित्रपटाने प्रदर्शित झाल्याच्या पहिल्याच दिवशी ३२.९३ कोटी रुपयांचा धंदा केला होता. पहिल्याच दिवशी सर्वात जास्त कमाई करणारा ‘एक था टायगर’ हा आजवरचा तिसरा चित्रपट ठरला आहे. पहिल्या दोन क्रमांकावर सलमानचा मित्र आमिर खानचा ‘धूम थ्री’ आणि दुसऱ्या क्रमांकावर शाहरूख खानच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ असे चित्रपट आहेत. आता बाकी कुठलाच नाही तर निदान सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट म्हणून ‘किक’ची नोंद व्हावी यासाठी सलमान खान प्रयत्नशील आहे. जशी रविवारी चित्रपटाला गर्दी झाली तशीच ईदच्या दिवशीही चांगली गर्दी होईल अशी त्याची अपेक्षा आहे.
‘लय भारी’चाही विक्रम
मराठीच्या रूपेरी पडद्यावर रितेश देशमुखचे पदार्पण असलेला झी टॉकीज प्रस्तुत निशिकांत कामत दिग्दर्शित ‘लय भारी’ चित्रपटाने या आठवडाअखेर ‘दुनियादारी’ चित्रपटाचा विक्रम मोडून २७ कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला आहे, अशी माहिती अधिकृतरित्या मिळाली आहे. यापूर्वी ‘दुनियादारी’ या चित्रपटाने सर्वाधिक २६ कोटींचा गल्ला गोळा केला होता. एकूण आठ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेला ‘लय भारी’ हा मराठी चित्रपटांमधील सर्वात महागडा चित्रपट आहे.