कोणी एखाद्याने महागडी गाडी घेतली असेल किंवा घर घेतलं असेल तर त्यावर सर्वसामान्यांचा पाहण्याचा दृष्टीकोन हा त्याच्यांकडे पैसा आहे म्हणून घेतलं असाच असतो. पण आता आम्ही तुम्हाला जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांची संपत्ती सांगणार आहोत. त्यांची संपत्ती वाचून तुम्हाला धक्का नाही बसला तर नवलच.

बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाच्या उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाला आपल्या संपत्तीची संपूर्ण माहितीही दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जया आणि अमिताभ या दोघांची मिळून १०.०१ अब्ज रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. यावेळी जया यांनी संपत्तीची कागदपत्र जमा केली. या कागदपत्रांवरील संपत्तीचा आकडा पाहून अनेकांनीच तोंडात बोटं घातली. जया यांच्याकडे १.९८ अब्ज रुपयांची संपत्ती आहे तर अमिताभ यांच्याकडे ८.०३ अब्ज रुपयांची संपत्ती आहे.

अमिताभ आणि जया यांचे जगभरातील अनेक देशांत बँक अकाऊंट आहेत. शपथपत्रानुसार या दोघांचे लंडन, दुबई आणि पॅरिसमध्ये बँक खाते आहे. देशात आणि परदेशात एकूण जया- अमिताभ यांचे १९ बँक खाती आहेत. यातील चार खातीही जया यांच्या नावावर आहेत. या खात्यांमध्ये एकूण ६.८४ कोटी रुपये आहेत. देशाबाहेर जया यांच्या नावे फक्त एक बँक खाते आहे. या खात्यात ६ कोटी ५९ लाख रुपये आहेत. अमिताभ यांच्या नावे १५ खाते आहेत, ज्यात एकूण ४७ कोटी ४७ लाख रुपये आहेत. बिग बी यांचे पैसे आणि एफडी हे दिल्ली- मुंबईसोबतच बँक ऑफ इंडियाच्या पॅरिस, लंडन शाखेत आहेत. तसेच बीएनपीच्या फ्रान्स शाखेतही बिग बी यांचे खाते आहे.

अमिताभ बच्चन यांच्याकडे जया बच्चन यांच्यापेक्षा जास्त दागिने आहेत. बिग बी यांच्याकडे ३६.३१ कोटी रुपयांचे दागिने आहेत तर जया बच्चन २६.१० कोटी रुपयांच्या दागिन्यांची मालकीण आहेत. इतकंच नाही तर अमिताभ बच्चन तब्बल ९ लाख रुपयांचं पेन स्वत:कडे बाळगतात, असं कागदपत्रांमधून समोर आलं आहे.

या कागदपत्रात त्यांच्यावर असणाऱ्या कर्जाचाही उल्लेख करण्यात आला आहे जया यांच्या नावावर ८७ कोटी ३४ लाख रुपयांचे कर्ज आहे. तर बिग बी यांच्या नावावर १८ कोटी २८ लाख रुपयांचे कर्ज आहे. गेल्या सहा वर्षात बच्चन कुटुंबियांचे मानधन दुपट्टीने वाढले आहे. २०१२ मध्ये राज्यसभा निवडणुकीसाठी जया यांनी अर्ज दाखल करताना त्यांची एकूण संपत्ती ५ अब्ज दाखवली होती. यावर्षी ही संपत्ती १०.०१ अब्ज झाली आहे. जया बच्चन यांनी २०१२ मध्ये समाजवादी पार्टीकडून निवडणुक लढवली होती. पार्टीने यावेळीही त्यांना तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशमध्ये राज्यसभेच्या १० जागांसाठी २३ मार्चला मतदान होणार आहे.