जग बदलत आहे, त्याप्रमाणे स्त्रियांनाही बदलण्याचा अधिकार आहे. घराच्या बाहेर पडताना ‘सातच्या आत घरी ये’ असे ओरडून सांगणारी आई आमचं वाईट चिंतत नाही, हे ठाऊक आहे. मात्र स्त्री-स्वातंत्र्य, अधिकार, स्त्री-पुरुष समानता या गोष्टी आमच्या पालकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. अत्याचार करणाऱ्या अमानवीय वृत्तींना कळण्याची गरज आहे. आम्हालाही स्वातंत्र्य हवं आहे, पण हे त्यांना कोण समजावणार..मनाच्या खोल कोपऱ्यात दडून बसलेला आवाज त्या मुलीने सभागृहात बोलून दाखवला..

२६ नोव्हेंबरपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर साजऱ्या करण्यात येणाऱ्या ‘महिला-हिंसाचारविरोधी पंधरवडय़ा’ निमित्ताने ‘मॅन अगेन्स व्हॉयलेंन्स अ‍ॅण्ड अब्युज’ (मावा)या संस्थेने आयोजित केलेल्या दोनदिवसीय ‘समभाव लघुपट/ माहितीपट उत्सवा’त वेगवेगळ्या देशातील आणि भाषेतील लघुपट प्रदर्शित करण्यात आले होते. या पंधरवडय़ाची सुरुवात ‘सेंटर फॉर विमेन्स ग्लोबल लिडरशीप’ या अमेरिकेतील संस्थेने १९९१ साली एका परिषदेपासून केली. यात देशभरातील २३ स्त्रिया सहभागी झाल्या होत्या. दरवर्षी एखादी मध्यवर्ती कल्पना घेऊन जागतिक ते स्थानिक पातळीवर जनजागृतीपर मोहीमा राबवल्या जातात.

[jwplayer voXexKMV]

आज स्त्री शिक्षित, कर्तृत्ववान झाली आहे. नोकरीपेक्षाही करिअरच्या दृष्टीने विचार करणाऱ्या स्त्रियांची संख्या अधिक आहे. मात्र स्त्री सक्षमीकरणासाठी, समानतेसाठी इतकं पुरेसं आहे का? आज एकटेपणाने भटकंती करणाऱ्या स्त्रियांची संख्या किती आहे, स्त्रीच्या शरीरावर रेंगाळणाऱ्या पुरुषांच्या नजरा किती त्रास देतात याची पुरुषांना खरंच कल्पना नसते का? बोहरी मुस्लीम या शिक्षित समाजात मुलींच्या वयाच्या सातव्या वर्षी   ‘खतना’ करण्यात येतो, मात्र या प्रथेविरुद्ध कोणताही कायदा नाही. समलैंगिकता ही फक्त लैंगिक नसून भावनिक पातळीवर अधिक आहे. अशा वेगवेगळ्या विषयांचा ऊहापोह यानिमित्ताने झाला. प्रेक्षकांना हे लघुपट/माहितीपट पाहायला मिळाले.

सुरुवात अरविंद व्ही.के यांच्या ‘ब्रोकन द इमेज’ या तमिळ भाषेतील लघुपटाने झाली. व्यवसाय की माणुसकी महत्त्वाची असा प्रश्न उभा करणाऱ्या या लघुपटात एका छायाचित्रकार पत्रकाराची कथा सांगण्यात आली आहे. पत्रकारितेत बातमीच्या मागे धावत असताना एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचविणे शक्य आहे हे भान विसरले जाते. या मर्मावर बोट ठेवणारा लघुपट प्रेक्षकांना भावला. त्यानंतर दाऊदी बोहरी मुस्लीम समाजात महिलांच्या ‘खतना’ या प्रथेविषयी आवाज उठविणारा प्रिया गोस्वामी यांचा ‘पिन्च ऑफ स्कीन’ हा लघुपट दाखविण्यात आला. यावेळी प्रथेविरुद्ध काम करणाऱ्या ‘साहियो’ या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी प्रेक्षकांशी संवाद साधला. धार्मिक प्रथेच्या नावाखाली वयाच्या सातव्या वर्षी मुलींच्या योनीमार्गावरील त्वचा ब्लेडने कापली जाते. सुशिक्षित समाजात आजही ही प्रथा सुरू आहे. या माहितीपटात बोहरा मुस्लीम समाजातील वेगवेगळ्या स्त्रियांच्या मुलाखती दाखविण्यात आला. लग्नापूर्वी मुलींमध्ये लैंगिक भावना जागृत होऊ नये म्हणून योनीमार्गात टाके घालून किंवा काही भाग कापून ही प्रथा केली जाते. लग्नापूर्वी मुलींनी ही प्रथा करणे अनिवार्य असून लग्नापूर्वी ‘खतना’ केल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्रही विचारण्यात येते. याचा परिणाम महिलांच्या शारीरिक आणि मानसिकतेवर होतो. मात्र याविषयी कोणी आवाज उठवत नाही. या भीषण प्रथेबाबत कायदा नसणे हे दुर्दैवी आहे.

या माहितीपटानंतर ‘व्हाय लॉयटर’ आणि ‘इनसाइट ऑऊट’ नावाचे ‘स्त्रियांची भटकंती’ या विषयावरील दोन लघुपट दाखविण्यात आले. रात्रीच्या मोकळ्या रस्त्यांवर भटकण्याची इच्छा असतानाही आज स्त्रियांना ते स्वातंत्र्य नाही. देशभरात सुरू असणारी ‘व्हाय लॉयटर’ ही चळवळ मुंबईत नेहा सिंह यांनी सुरू केली आहे. स्त्रियांवर अतिप्रसंग होतील या भीतीमुळे स्त्रियांना रात्री फिरण्यास मनाई केली जाते. मात्र गुन्हा करणाऱ्या पुरुषांनाच घरात बंद का केले जात नाही, असे अनेक प्रश्न या माहितीपटाच्या निमित्ताने उपस्थित करण्यात आले. एका मुस्लीम भागात फिरणारी एकटी मुलगी मोकळेपणाचा अनुभव घेते. तेथीलच एका टपरीवर जाऊन चहा पिते. हातगाडीवर जाऊन बसते. या गोष्टी एकटी महिलेने वागणे खूप कठीण आहे. काही प्रमाणात हा बदल होण्यास सुरुवात झाली असली तरी एकटय़ा मुलीकडे कायम पुरुषांची नजर असते, असे या माहितीपटातून दाखविण्यात आले.

दुसऱ्या दिवशी ‘बॉय कॅन नॉट बी बॉय’, डॉ. हरजंत गिल यांचे ‘मर्दीस्तान’, मावा संस्थेचा ‘युवा मैत्री’, रवी जाधव यांची ‘मित्रा’, रोहन खंडावडे यांचे ‘सुंदर’ आणि सर्वात शेवटी ‘वॉकिंग द वॉक’ असे अनेक लघुपट यावेळी दाखविण्यात आले. ‘बॉय कॅन नॉट बी बॉय’ या लघुपटात पुरुषांच्या वागण्याबद्दलची चौकट बदलण्याबाबतची सूचना करण्यात आली. पुरुषांनी रडू नये, गुलाबी रंगाचे शर्ट घालू नये याबाबत समाजाचा दृष्टिकोन बदलण्याची आवश्यकता आहे. तर स्त्रियांच्या पार्लरमध्ये काम करणाऱ्या आणि स्त्रियांसारखा पेहराव करण्याची आशा असणाऱ्या एका मुलाची कथा यांमध्ये दर्शविण्यात आली आहे. रवी जाधव यांच्या ‘मैत्रा’ या लघुपटात समलैंगिकतेबद्दलचे भाष्य करण्यात आले आहे. विजय तेंडुलकरांनी लिहिलेल्या ‘मित्राची गोष्ट’ या कथेचे लघुपटात रूपांतर करण्यात आले आहे. सर्वात शेवटी ‘मर्दिस्तान’ या लघुपटात ४ पुरुषांच्या वेगळ्या विचारांना वाट करून देण्यात आली आहे.

या दोन दिवसांच्या सिनेउत्सवात वेगवेगळे विषय हाताळण्यात आले होते. ‘मावा’ या संस्थेने ‘युथ फॉर जेंडर इक्वेलिटी’ या नावाच्या ब्लॉगचे अनावरण या उत्सवात करण्यात आले. लैंगिक प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी हे व्यासपीठ निर्माण केले असल्याचे संस्थेचे हरीश सदानी यांनी सांगितले.

[jwplayer bZoVXId4]