‘बिग बॉस’ची एक्स कंटेस्टेंट संभावना सेठच्या वडिलांचं ह्दयविकाराच्या झटक्यामुळे निधन झालं. काही दिवसांपूर्वीच ते करोना पॉझिटिव्ह आले असून त्यांना बेड मिळत नसल्याची माहिती संभावनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. त्याच्या काही दिवसानंतरच नवी दिल्लीतल्या एका रूग्णालयात उपचार सुरू असतानाच हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. वडिलांच्या निधनाच्या काही दिवसानंतरच संभावनाने रूग्णालयाचा कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तिचे वडिल करोना पॉझिटिव्ह आलेच नसून तिच्या वडिलांच्या ‘मेडिकली मर्डर’ साठी रूग्णालातील कर्मचारीच दोषी असल्याचा दावा संभावनाने केलाय.

संभावना सेठने काही दिवसांपूर्वीच तिच्या सोशल मीडियावर अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. यात तिने तिच्या वडिलांच्या मृत्यूला ‘मेडिकल मर्डर’ दाखवत यासाठी रूग्णालयाला जबाबदार ठरवलं होतं. त्यानंतर आता तिने यासंदर्भात रूग्णालयाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. यात तिने रूग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे, रूग्णाला व्यवस्थित न हाताळल्यामुळे, कोणतीही शंका विचारल्यास व्यवस्थित उत्तर देण्यासारखे अनेक आरोप केले आहेत.

सॅच्युरेशन व्यवस्थित होती, तरीही ऑक्सिजन सपोर्टवर ठेवलं…
एक माध्यमाशी बोलताना संभावना सेठ म्हणाली, “माझे वडील करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर ४ दिवसांनी ३० एप्रिल रोजी त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथल्या मेडिकल स्टाफने त्यांच्या रक्ताची चाचणी केली आणि लवकरच ते बरे होतील, असं देखील सांगितलं होतं. त्यानंतर आम्ही सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. त्याच दिवशी जेव्हा भाऊ रूग्णालयात गेला तेव्हा वडिलांचे हात पाय बांधून ठेवल्याचं त्याने पाहिलं. याबाबत माझ्या भावाने रूग्णालयाकडे स्पष्टीकरण मागितलं तर तबाडतोब वडिलांचे बांधलेले हात पाय खुले केले. त्यावर रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितलं, वडिलांना स्वतःच्या हाताने सलाईन काढता येऊ नये म्हणून त्यांनी त्यांचे हात पाय बांधले होते. त्यानंतर ७ मे रोजी माझ्या भावाने घाबरून मला कॉल केला आणि वडिलांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवलं असल्याचं सांगितलं. वडिलांची सॅच्युरेशन लेव्हल ९० ते ९५ मध्ये होती, तरीही त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं. मला यात काही तरी गडबड वाटली आणि तात्काळ नवी दिल्ली गाठली.”

वडिलांचे हात पाय बेडला बांधले होते…
यापुढे बोलाताना संभावना म्हणली, “माझ्या वडिलांचे हात पाय त्यांनी बेडला बांधले होते हे ऐकून मला धक्काच बसला. ते त्याचं ऑक्सिजन सप्लाय थांबवत होते म्हणून त्यांचे हात पाय बांधल्याचं तिथल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं. माझ्या वडिलांना हाताळण्यासाठी तिथे कुणीच कर्मचारी देखील नव्हते. मेडिकल सुविधा देखील निष्कृष्ठ दर्जाच्या होत्या. या सगळ्या समस्या लोकांसमोर आणण्यासाठी मी व्हिडीओ शूट केला तर तिथे मला रोखण्यात आलं. माझ्याशी हुज्जत घालून तो व्हिडीओ डिलीट करण्यासाठी सांगितलं.

वडिलांच्या निधनाबाबत संभावना सेठच्या मनात असे अनेक प्रश्न आणि शंका निर्माण झाल्या आहेत, त्या सर्व शंकाचे निरसन करण्यासाठी संभावनाने रूग्णालयाला ही नोटीस पाठवली आहे. त्यावर आता रूग्णालयाकडून काय उत्तर येतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.