भोजपुरी अभिनेत्री संभावना सेठची तब्येत बिघडल्याने तिला २४ तासांत दोन वेळा रुग्णालयात दाखल करावं लागलं. मात्र उपचारासाठी तिला व तिच्या पतीला खूप धडपड करावी लागली. सात रुग्णालयांनी तिला दाखल करून घेण्यास नकार दिला. हा धक्कादायक अनुभव तिने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितला.

“गेल्या काही वर्षांपासून मला सर्दी, खोकल्याचा त्रास आहे. त्यातून बरं होण्यासाठी किमान मला २० दिवस लागतात. मी औषध घेत होते. मला करोनाची लागण झाल्याचं समजतील म्हणून मी कोणाला याबद्दल सांगितलं नाही. रविवारी संध्याकाळी माझी तब्येत आणखी बिघडली. माझा रक्तदाब खूप कमी होता. माझा एक कान दुखू लागला होता. सोमवारी सकाळपर्यंत वेदना मला असह्य झाल्या. रुग्णालयात उपचारासाठी गेले असता कोणीच मला दाखल करून घेत नव्हतं. जवळपास सात रुग्णालयांमध्ये आम्ही गेलो होतो, पण कोणीच मला तपासण्यास तयार नव्हते. अखेर एका रुग्णालयाने माझी वैद्यकीय तपासणी केली. मात्र संबंधित डॉक्टर त्या रुग्णालयात नसल्याने माझ्यावर उपचार होऊ शकले नाही”, असं तिने सांगितलं.

घरी आल्यानंतर तिने व्हिडीओद्वारे काही डॉक्टरांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचाही फार उपयोग झाला नाही. अखेर मंगळवारी सकाळी एका डॉक्टरने तिला रुग्णालयात बोलावलं आणि तपासणीअखेर तिच्या कानाला इन्फेक्शन झाल्याचं समजलं. या अनुभवाचा चांगलाच धसका संभावनाने घेतला. एखाद्याच्या घरी वयोवृद्ध किंवा लहान बाळ असेल आणि त्यांना उपचाराची गरज असेल तर काय होणार, असा प्रश्न तिने उपस्थित केला.