बॉलिवूड अभिनेता सलमान खानला काही दिवसांपूवी काळवीट शिकार प्रकरणाची जोधपूर न्यायालयात सुनावणी होत असताना, लॉरेन्स बिश्नोई या नावाने उघडपणे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तेव्हा लॉरेन्सच्या धमकीकडे लोकांनी फारसे लक्ष दिले नाही. पण ६ मे रोजी लॉरेन्सचा सहकारी संपत नेहराला हरियाणा पोलिसांनी अटक केली आणि त्याच्याकडून लॉरेन्सचा खुनाचा कट कळला. यामुळेच सलमानच्या सुरक्षेत आता वाढ करण्यात आली आहे.

शार्प शूटर संपतला हरियाणा पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने हैदराबादमध्ये अटक केली. चौकशीदरम्यान संपतने अनेक खुलासे केले. यात सलमानच्या हत्येचा कट रचल्याचेही त्याने सांगितले. सध्या तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईचा काळवीटाची शिकार केल्यामुळे सलमानवर नाराज होता. यामुळेच त्याने सलमानची हत्या करण्याचा कट रचला.

लॉरेन्सच्या सांगण्यावरुनच संपत मुंबईत आला होता. यासाठीत्याने रेकीही केली होती. पोलिसांना संपतच्या मोबाईलमधून सलमानच्या गॅलेक्सी घराचे काही फोटोही सापडले. या संपूर्ण प्रकरणाबद्दल हरियाणा पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सच्या डेप्युटी इन्सेक्टर सतीश बालन म्हणाले की, मेच्या पहिल्या आठवड्यात संपत सलमानच्या मुंबई येथील घराच्या बाहेर रेकी करत होता. सलमान जेव्हा त्याच्या चाहत्यांना भेटायला घराबाहेर येतो तेव्हाचे काही फोटो संपतकडे सापडले. सलमानची बाल्कनी ते त्याचे अंतर मोजण्यासाठी संपतने फोटो काढले होते. सलमानची हत्या करण्यासाठी संपतला लवकरच हत्यार मिळणार होते.

गेल्या २० दिवसांपासून संपत नोकरीच्या शोधात असल्याचे सांगत एका फ्लॅटमध्ये राहत होता. सलमानची हत्या करुन परदेशात जाण्याचा त्याचा कट होता. लॉरेन्स बिश्नोई गँग राजस्थानमध्ये फार सक्रीय गँग आहे. स्वतः लॉरेन्स सध्या तुरुंगात आहे. लॉरेन्सने सलमानला तुरूंगातच जीवे मारण्याची धमकी दिली होती.