अभिनेत्री झायरा वसिमनंतर आता आणखी एका अभिनेत्रीने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सलमान खानसोबत काम केलेली आणि ‘बिग बॉस’मध्ये सहभागी झालेली अभिनेत्री सना खान हिने गुरुवारी सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये तिने इस्लामसाठी चित्रपटसृष्टी सोडत असल्याचं म्हटलं आहे. सना खानने तिच्या धर्माला आधार मानत बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या आधी ‘दंगल’ चित्रपटामुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री झायरा वसिम हिनेसुद्धा इस्लामसाठी बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर बराच वादसुद्धा झाला होता.
सना खानने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘आज मी माझ्या आयुष्याच्या अत्यंत महत्त्वाच्या वळणावर आली आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केलं आणि त्या काळात मला प्रसिद्धी, पैसा, सन्मान या सर्व गोष्टी मिळाल्या. पण पैसा आणि प्रसिद्धीच्याच मागे धावणं हा एकमेव जगण्याचा उद्देश आहे का, असा प्रश्न मला सतावू लागला. गरजू व्यक्तींना मदत करण्याचं कर्तव्य प्रत्येकाचं नाही का? या प्रश्नांची उत्तर मी बऱ्याच काळापासून शोधत होते. जेव्हा मी माझ्या धार्मिक शिकवणीत या प्रश्नांची उत्तर शोधली, तेव्हा मला समजलं की फक्त पैसा आणि प्रसिद्धी कमावणं हाच आयुष्याचा एकमेव उद्देश नाही. त्यामुळे मी आजपासून फिल्म इंडस्ट्रीला कायमचा रामराम करण्याचा निर्णय घेते आणि यापुढे मी लोकांची, गरजूंची सेवा करेन.’
सना खानने ‘बिग बॉस’च्या सहाव्या सिझनमध्ये भाग घेतला होता. प्रसिद्ध कोरिओग्राफर मेल्विन लुईसची ती गर्लफ्रेंड होती. मात्र काही दिवसांपूर्वीच त्या दोघांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर तिने मेल्विनवर अनेक आरोपसुद्धा केले होते. आता सना पुन्हा एकदा चित्रपटसृष्टी सोडण्याच्या निर्णयामुळे चर्चेत आली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 9, 2020 10:47 am