संगीत क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा ग्रॅमी पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. विशेष करून इंग्रजी संगीत क्षेत्रातील कलाकारांकरिता हा पुरस्कार असतो. मात्र, यंदाच्या या पुरस्कार सोहळ्यात भारतीय तबला वादक संदीप दास याला ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संदीपच्या ‘सिंग मी होम’ या अल्बमला पुरस्कार मिळाला आहे. यो यो मा, सिल्क रोड एन्सेम्बल, लिस लुईशनर आणि संदीप यांनी मिळून हा अल्बम तयार केला होता.

संदीपला ज्या विभागात पुरस्कार मिळाला त्याच विभागात भारतीय सतार वादक अनुष्का शंकर हिच्या ‘लॅण्ड ऑफ गोल्ड’ला नामांकन मिळाले होते. मात्र, अनुष्काला सहाव्यांदा या पुरस्काराने हुलकावणी दिली. आतापर्यंत विविध विभागांमध्ये नामांकन मिळूनही अनुष्का सहाव्यांदा हा पुरस्कार पटकावण्यास अपयशी ठरली. यो यो माच्या ‘सिंग मी होम’ मधील गाणी जगातील विविध कलाकारांनी संगीतबद्ध केलेली आहेत. सतत घर बदलण्याच्या कल्पनेचे या अल्बममध्ये विश्लेषण करण्यात आलेले आहे. हा अल्बम ‘द म्युझिक ऑफ स्ट्रेन्जर्स : यो यो मा अॅण्ड द सिल्क रोड एन्सेम्बल’ या डॉक्युमेण्ट्रीवर आधारित आहे. आपल्या अल्बमविषयी बोलताना दास म्हणाला की, एन्सेम्बलने या अल्बममधून एकमेकांच्या संस्कृतीबद्दल ऐक्य आणि आदर राखण्याचा प्रभावी संदेश दिला आहे.

yoyomsa

मा आणि दास वगळता या अल्बममध्ये न्यू यॉर्कमधील सीरियन सनई वादक किनन अझमह याचाही समावेश आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सात मुस्लिम बहुसंख्य देशातील नागरिकांना तेथे जाण्यास निर्बंध घातल्यानंतर किनन अझमहने त्यांच्या विरोधात आवाज उठवला होता.

दरम्यान, ३५ वर्षीय अनुष्का शंकर ही ब्रिटीश दिग्दर्शक पती जो राइट याच्यासह पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होती. प्रसिद्ध सतार वादक पं. रवी शंकर यांची मुलगी असलेल्या अनुष्काला वयाच्या २० व्या वर्षी पहिले ग्रॅमी नामांकन मिळाले होते. पण, अनुष्काला आतापर्यंत विविध नामांकन मिळूनही सदर पुरस्काराला गवसणी घालण्यात यश आलेले नाही.