01 March 2021

News Flash

सिद्धार्थ चांदेकरचे मालिकेद्वारे पुनरागमन

मालिकेत स्वराजच्या भूमिकेलाच खूप कंगोरे आहेत. यासाठी मला विशेष कष्ट घ्यावे लागले नाही.

|| मानसी जोशी

वेब मालिका, चित्रपट आणि टीव्ही मालिका या तिन्ही माध्यमांत आपल्या दमदार अभिनयाने चित्रपटसृष्टीत वेगळे अस्तित्व निर्माण करणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर ‘स्टार प्रवाह’वरील ‘सांग तू आहेस का’ या मालिकेद्वारे पुनरागमन करतो आहे.
करोनाकाळातील या सात-आठ महिन्यांत मराठी चित्रपटसृष्टीतील सध्याचे लोकप्रिय चेहरे कुठे आहेत, याचा काही थांगपत्ता लागत नव्हता. त्यातल्या त्यात अभिनेता स्वप्निल जोशीला प्रेक्षकांनी ‘चला हवा येऊ द्या’च्या निमित्ताने अनुभवले. आता चित्रपटात रमलेला आणखी एक कलाकार पुन्हा मालिके तून लोकांसमोर येतो आहे तो म्हणजे सिद्धार्थ चांदेकर. योगायोग म्हणजे सिद्धार्थ आणि स्वप्निल हे दोघेही गेल्या वर्षी ‘जिवलगा’ या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरीलच मालिके त एकत्र आले होते. या वेळी सिद्धार्थ वाहिनीवर ‘सांग तू आहेस का’ या मालिकेतून परतला आहे. या मालिकेत भयकथा आणि रहस्य अशा दोन्ही प्रकारचे मिश्रण प्रेक्षकांना पाहण्यास मिळेल, असे मत सिद्धार्थने व्यक्त केले. आपल्याकडे भयकथेची पाश्र्वभूमी असलेल्या मालिकेची वेगळी व्याख्या तसेच वेगळे परिमाण असते. भयकथा असलेल्या मालिकेत पछाडलेली भूते, मांत्रिकांनी केलेला जादूटोणा या गोष्टी असणे गरजेचे असते. या मालिकेत एका कुटुंबाची कथा आहे आणि मालिकेच्या प्रत्येक भागानुसार या कुटुंबात घडत जाणारे नाटय़ पाहायला मिळेल. अर्थात मालिकेला भयकथेची किनार आहे. यात मी उच्चशिक्षित अत्यंत श्रीमंत घरातील अशा स्वराज जोशी या अभिनेत्याची भूमिका साकारतो आहे. त्याच्या आयुष्यात घडलेल्या काही घटनांमुळे चित्रपटसृष्टीपासून तो काही काळ दूर गेला आहे. मात्र आता तो जवळजवळ तीन वर्षांनी पुनरागमन करतो आहे. स्वत:च्या बळावर त्याला पुन्हा आपले अस्तित्व निर्माण करायचे आहे, अशी कथेची पाश्र्वभूमी सिद्धार्थने उलगडून सांगितली.

मालिकेत स्वराजच्या भूमिकेलाच खूप कंगोरे आहेत. यासाठी मला विशेष कष्ट घ्यावे लागले नाही. यात मालिकेच्या पहिल्या भागापासून त्याचा भूतकाळ, तसेच गोष्ट प्रेक्षकांना उलगडत जाईल. यादरम्यान स्वराजला बायकोची म्हणजेच वैभवीची तीव्रतेने आठवण येते. या मालिकेचे वैशिष्टय़ असे की, या मालिके चा एक विशिष्ट असा प्रेक्षकवर्ग नाही. सर्व कुटुंबाला एकत्र मिळून पाहाता येईल अशी ही मालिका आहे. ही मालिका गावापासून शहरापर्यंत सर्व प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेईल. मांडणी साधी आहे पण रहस्यमय असल्याने प्रेक्षकांना थोडी गुंतागुंतीची वाटण्याची शक्यता असल्याचेही त्याने स्पष्ट केले. ‘सांग तू आहेस का’ या मालिकेत आपल्या मूळ स्वभावाच्या विरुद्ध असलेली भूमिका साकारत असल्याचे तो सांगतो. स्वराजला परिस्थितीने तसे गंभीर बनवले आहे. मी खऱ्या आयुष्यात तसा नाही. मी जास्त बडबडय़ा आणि खुशालचेंडू स्वभावाचा आहे. लोकांशी बोलायला तसेच त्यांच्यात मिसळायला मला प्रचंड आवडते. त्यामुळे ही भूमिका साकारताना थोडीशी काळजी घ्यावी लागत असल्याचेही सिद्धार्थने सांगितले.

सध्या करोनाच्या पाश्र्वभूमीवर मालिकांच्या सेटवर स्वच्छता आणि आरोग्याची मोठय़ा प्रमाणावर काळजी घेतली जात आहे. यात र्निजतुकीकरण तसेच आंतरनियमांचे पालन केले जात आहे. मालिकेतील सर्व तंत्रज्ञ आणि कलाकारांचा विमा उतरवण्यात आला आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणावर काळजी घेतली जात असली तरी सध्या काम करताना आपल्याला करोना होणार नाही ना याचीही काळजी सतावते. उद्या मालिकेतील मुख्य कलाकार आजारी पडल्यास संपूर्ण मालिकेचे चित्रीकरण थांबेल तसेच त्यावर अवलंबून असणाऱ्या शेकडो लोकांचे पोट भरणार नाही. त्यात आधीच सात महिने चित्रपटसृष्टी आणि छोटय़ा पडद्याचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे अजून नुकसान आर्थिकदृष्टय़ा परवडणारे नाही. हे सगळं लक्षात ठेवत सध्या शंभर टक्के काळजी घेत चित्रीकरण सुरू असल्याचेही त्याने सांगितले.

लग्नाची बेडी

सिद्धार्थ पुढच्या वर्षी अभिनेत्री मिताली मयेकरबरोबर लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. मितालीही सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘लाडाची मी लेक’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारते आहे. सिद्धार्थ आणि मिताली खासगी आणि वैयक्तिक जीवनाचा उत्तम प्रकारे समतोल साधतात. मितालीच्या मालिकेचा सेट माझ्या चित्रीकरणस्थळापासून जवळ असल्याने आम्ही एकत्र जातो. टाळेबंदीत आम्ही पुरेसा वेळ एकमेकांना दिला असून आता कामावरच लक्ष देण्याची गरज असल्याचे मत तो व्यक्त करतो. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ तसेच एका वेबमालिके तून तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2020 2:41 am

Web Title: sang tu ahes ka siddharth chandekar mppg 94
Next Stories
1 ‘बॉलीवूड वाईव्हज’वरून रंगलेला वाद
2 दूरची चित्रवाणी
3 ‘परंपरा आणि नावीन्य दोन्ही जपणं हीच यश चोप्रांची खासियत’
Just Now!
X