प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, नाट्यलेखक राजीव नाईक आणि सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांची संगीत नाटक अकादमी पुरस्कार, २०१८ साठी निवड करण्यात आली आहे. गायक सुरेश वाडकर यांची सुगम संगीत विभागातील संगीत नाटक अकादमी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे तर लेखक राजीव नाईक आणि सुहास जोशी यांची नाट्य विभागातील पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तबलानवाज उस्ताद झाकीर हुसेन यांची अकादमी फेलोशिप प्रदान करण्यात येणार आहे.

केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत संगीत नाटक अकादमी दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य आणि लेाककला क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारांना सन्मानित करते. प्रेमगीते, गझल, कव्वाली, भजने अशी गीते लीलया गाणारे व मराठीसह हिंदूी, इंग्रजी, उर्दू, पंजाबी भाषांची चांगली जाण असणारे सुरेश वाडकर म्हणजे अष्टपैलू व सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्व आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांनी अनेक चित्रपटांमध्ये आणि नाटकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

मागील वर्षी प्रसिद्ध नाट्यलेखक अभिराम भडकमकर, नाट्य दिग्दर्शक सुनील शानबाग, लोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे आणि तबलावादक योगेश सामसी या महाराष्ट्रातील कलाकारांना राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.