‘व्यक्ती एक रुपं अनेक’ या टॅगलाइनने अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपट ‘संजू’ प्रेक्षकांच्या भेटील आला. हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर यशस्वी ठरत असला तरी त्यावर प्रेक्षकांच्या संमीश्र प्रतिक्रिया येत आहेत. संजय दत्तच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी यात दाखवल्या नसून त्याला केवळ अतिमहत्त्व देण्यात आल्याचंही मत अनेकांनी नोंदवलं आहे. या बायोपिकनंतर आता बॉलिवूडच्या खलनायकाचं अर्थात संजूबाबाचं आत्मचरित्र प्रकाशित होणार आहे.

पुढच्या वर्षी हे आत्मचरित्र वाचकांच्या भेटीला येणार असून त्याचं नाव अद्याप जाहीर करण्यात आलं नाही. चित्रपटात संजय दत्तच्या वैयक्तिक आयुष्यातील बऱ्याच गोष्टी दाखवण्यात आल्या नाहीत. त्याच्या पहिल्या दोन पत्नींविषयी असो किंवा मुंबई बॉम्बस्फोटानंतर त्याच्याकडे आढळलेले सात हँड ग्रेनेड्स असो, याबद्दल चित्रपटात काहीच दाखवण्यात आलं नाही. त्यामुळे आता आत्मचरित्राच्या माध्यमातून तरी या गोष्टी समोर येतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

वाचा : ‘नागराज मंजुळेंनी ‘धडक’ पाहण्याची प्रतीक्षा करतोय’

या आत्मचरित्राविषयी संजय दत्त म्हणाला की, ‘माझ्या आयुष्यात मी बरेच चढउतार पाहिले आहेत. बऱ्याच रंजक गोष्टी आहेत ज्या मला कधीच कोणाला सांगता आल्या नाहीत. त्यामुळे आता आत्मचरित्राच्या रुपात त्या गोष्टी मी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.’
पुढच्या वर्षी संजय दत्तच्या वाढदिवशी म्हणजेच २९ जुलै २०१९ रोजी या आत्मचरित्राचं अनावरण होणार आहे.