18 November 2017

News Flash

संजय दत्तने पूर्ण केली वडिलांची शेवटची इच्छा

संजय दत्त त्याच्या आगामी 'भूमी' या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी वाराणसीला गेला.

मुंबई | Updated: September 14, 2017 9:15 AM

संजय दत्तने गंगा नदीघाटावर वडील दिवंगत अभिनेते सुनील दत्त आणि आई नर्गिस यांचा श्राद्धविधी करून आपल्या वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण केली.

अभिनेता संजय दत्तने गंगा नदीघाटावर वडील दिवंगत अभिनेते सुनील दत्त आणि आई नर्गिस यांचा श्राद्धविधी करून आपल्या वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण केली. संजय दत्त त्याच्या आगामी ‘भूमी’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी वाराणसीला गेला असून, प्रसिद्धी कार्यक्रमापूर्वी त्याने पिंडदानाचा विधी पूर्ण केला. यावेळी संजय दत्तसोबत ‘भूमी’ चित्रपटाची टीमदेखील होती. या चित्रपटात संजयच्या मुलीची भूमिका साकारणार्‍या अभिनेत्री आदिती राव हैदरी हिनेदेखील श्राद्धविधीला उपस्थिती लावली.

वाचा : ‘बिग बॉस’चा माजी स्पर्धक अपघातात जखमी; मदतीऐवजी पोलीस फोटो काढण्यात मग्न

राणी घाटावर रखरखीत उन्हात जवळपास अर्धा तास हा विधी चालला. सिद्धिविनायक मंदिराचे पुजारी राजेंद्र कुमार शर्मा यांच्यासह ८ पुजाऱ्यांनी श्राद्धविधी पूर्ण केला. सर्व विधी आटोपल्यानंतर संजयने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तो म्हणाला की, ‘तुरुंगातून सुटल्यानंतर पिंडदान नक्की करशील, असे बाबा मला म्हणाले होते. त्यामुळेच त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी आज हा विधी केला.’ यावेळी २१ लीटरचा दुग्धाभिषेक करण्यात आला.

वाचा : प्रद्युम्नच्या हत्येवर प्रसून जोशींनी लिहिलेली कविता वाचून तुम्हीही व्हाल भावूक

त्यानंतर संजयला काशी विश्वनाथ मंदिर आणि काळभैरव मंदिरात दर्शनासाठी जायचे होते. मात्र, चाहत्यांची गर्दी झाल्याने शेवटच्या क्षणी कार्यक्रमात बदल करण्यात आला. तिथून संजय चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमासाठी थेट सनबीम शाळेत पोहोचला.

First Published on September 14, 2017 9:15 am

Web Title: sanjay dutt complete his father sunil dutts last wish before starting bhoomi pramotion in varanasi