अभिनेता संजय दत्तने कर्करोगावर मात केली आहे. काही दिवसांपूर्वी त्याने ट्विट करत ही माहिती दिली. त्यामुळे प्रेक्षकांचा लाडका संजूबाबा लवकरच त्याच्या आगामी चित्रपटामध्ये झळकणार आहे. परंतु, यावेळी प्रेक्षकांना संजय दत्तच्या अॅक्शन सीनपासून मुकावं लागणार आहे. संजय अद्यापही शारीरिकदृष्ट्या तंदरुस्त न झाल्यामुळे त्याला अॅक्शन सीनसारखी कामं करता येणार नाहीत.

संजय लवकरच ‘पृथ्वीराज’ आणि ‘KGF 2’ या चित्रपटात झळकणार आहे. या दोन्ही चित्रपटांमध्ये त्याचे अनेक अॅक्शन सीन होते. मात्र, आता या दोन्ही चित्रपटांमध्ये काही अंशी बदल करण्यात आला आहे. संजयचे अॅक्शन सीन या चित्रपटांमधून कमी करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
संजय दत्तने कर्करोगावर जरी मात केली असली, तरीदेखील शारीरिकदृष्ट्या सध्या तो कमकुवत आहे. त्यामुळे त्याला आरामाची गरज आहे. त्यामुळे चित्रपटातील त्याच्या अॅक्शन सीनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. ११ ऑगस्ट रोजी संजय दत्तने या संदर्भात सोशल मीडियाद्वारे माहिती दिली होती.