26 February 2021

News Flash

संजूबाबाकडे अद्यापही चित्रपटांचा दुष्काळ?

चित्रपट स्वीकारण्यासाठी तो कोणत्याही प्रकारची घाई करत नाही आहे.

संजय दत्त

अभिनेता संजय दत्त त्याच्या कारावासाची शिक्षा भोगून फेब्रुवारी महिन्यात बाहेर आला. तो कारागृहातून बाहेर येण्यापूर्वीच संजय दत्त कोणकोणत्या चित्रपटांमध्ये काम करणार याबाबत फार चर्चा रंगली होती. पण अद्यापही संजय दत्तच्या कोणत्याही चित्रपटाचे चित्रिकरण सुरु झालेले नाही. संजूबाबाच्या निकटवर्तीयांच्या म्हणण्यानुसार त्याची काही चित्रपटांबाबत निर्मात्यांसोबत सध्या चर्चा सुरु आहे. असे असले तरीही सध्यातरी संजय दत्तच्या हाती ‘मुन्नाभाई’ व्यतिरिक्त इतर कोणताही चित्रपट नाही. त्याच्याकडे चित्रपटांचा दुष्काळ असला तरीही दिग्दर्शक राजकुमार हिरानी मात्र सध्या संजूबाबाच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्यामध्ये व्यस्त आहेत. राजकुमार हिरानी सध्या व्यस्त असल्यामुळे ‘मुन्नाभाई’ या चित्रपटाच्या सिरीजमधील तिसरा चित्रपट लांबणीवर पडला आहे.
संजय दत्तच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार तो चित्रपट स्वीकारण्यासाठी कोणत्याही प्रकारची घाई करत नाही आहे. तुर्तास संजय त्याच्या कुटुंबासह वेळ घालवण्यास प्राधान्य देत आहे. त्याच्या आगामी ‘मार्को भाऊ’ या चित्रपटाच्या चित्रिकरणाला डिसेंबर महिन्यात सुरुवात होईल. या चित्रपटाच्या सहाय्याने संजूबाबा रुपेरी पडद्यावर दणक्यात पुनरागमन करणार असल्याचे म्हटले जाते. २०१७ मध्येच हा चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीला येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान संजय दत्तच्या जीवनावर साकारल्या जाणाऱ्या चित्रपटाविषयी मध्यंतरी फारच चर्चा रंगल्या होत्या. अभिनेता रणबीर कपूर या चित्रपटामध्ये संजय दत्तच्या भूमिकेत दिसणार असून मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान त्याच्या वडिलांची म्हणजेच सुनिल दत्त यांची व्यक्तिरेखा साकारणार असल्याच्या चर्चेला काही दिवसांपूर्वी उधाण आले होते.
एका प्रतिष्ठित कलाकार कुटुंबातून आलेला संजय दत्त हा त्याच्या काही भूमिकांसाठी सिनेरसिकांचा आवडता अभिनेता ठरला आहे. संजय दत्तने रंगवलेले ‘मुन्नाभाई’ हे पात्र अनेकांच्या पसंतीस उतरले. त्यामुळे ‘मुन्नाभाई’ या चित्रपटाच्या पुढच्या भागात संजय दत्त कोणत्या नव्या अवतारात दिसणार याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2016 1:59 pm

Web Title: sanjay dutt has not started any work all his projects are taking time
Next Stories
1 ट्विंकल माझी थट्टा करणं बंद कर- ऋषी कपूर
2 ‘बाप्पा मी तुझी पूजा करतोय… माझी नरकातली शिक्षा कमी कर’
3 अनुपम खेर देत आहेत ‘पर्सनालिटी’चा कानमंत्र
Just Now!
X