आमिर खान अभिनित आणि राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘पीके’ हा अभिनेता संजय दत्तचा तुरुंगात गेल्यानंतर प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट होता. २५ फेब्रुवारीला सकाळी बॉलीवूडचा लाडका ‘संजूबाबा’ येरवडा तुरुंगातून बाहेर येणार, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे आता बाहेर आल्यानंतर त्याचा पहिला चित्रपट कोणता असेल? यावर अनेक तर्कवितर्क सुरू आहेत. संजय दत्तची सगळ्यात जवळची जोडी ही निर्माता विधू विनोद चोप्रा आणि दिग्दर्शक राजकुमार हिरानी असल्याने त्यांच्याचबरोबर तो पहिला चित्रपट करणार हे साहजिक आहे. संजयसाठी केवळ ‘मुन्नाभाई’चीच नाही तर अनेक पटकथा तयार असून त्याच्या बाहेर येण्याची वाट पाहात आहोत, असे सांगत विधू विनोद चोप्रा यांनी तो पहिल्यांदा तिसऱ्या सिक्वलवरच काम करणार यावर शिक्कामोर्तब केले आहे.
‘पीके’च्या चित्रीकरणादरम्यानच ‘मुन्नाभाई’च्या तिसऱ्या सिक्वलची तयारी सुरू झाली होती, मात्र त्याच वेळी २०१३ च्या मेमध्ये संजयला ९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी शिक्षा झाली आणि त्याची रवानगी येरवडा तुरुंगात झाली. त्याच वेळी संजय दत्तशिवाय मुन्नाभाईची चित्रपट मालिका होणार नाही. तो बाहेर पडल्यानंतर तिसऱ्या सिक्वलचे काम सुरू होईल, असे आश्वासन दिग्दर्शक राजकुमार हिरानींनी दिले होते. गेल्या आठवडय़ात ‘वजीर’ चित्रपटाच्या निमित्ताने प्रसिध्दीमाध्यमांसमोर आलेल्या विधू विनोद चोप्रा यांनी संजय फेब्रुवारीत तुरुंगातून सुटणार असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्याच वेळी ‘मुन्नाभाई’च्या तिसऱ्या सिक्वलच्या पटकथेचे काम सध्या सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर संजय दत्त पहिल्यांदा ‘मुन्नाभाई’च्याच चित्रीकरणाला सुरुवात करेल, अशी अटकळ बांधली जात आहे.