बॉलिवूड दिग्दर्शक राजकुमार हिरानी संजय दत्तच्या आयुष्यावर चित्रपट बनविणार आहेत. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून संजय दत्त चांगलाच प्रकाश झोतात आला आहे. संजय दत्तच्या या चित्रपटामध्ये त्याच्या भूमिकेत कोण दिसणार यापासून ते त्याच्या आई वडिलांची भूमिका कोण साकारणार अशा अनेक चर्चा रंगल्या. तसेच संजूबाबाच्या आयुष्यात आलेल्या प्रेयसिंच्या व्यक्तिरेखांबाबत देखील चांगलीच चर्चा रंगली. या चित्रपटाचे अद्यापही नाव निश्चित झालेले नाही. मात्र संजूबाबाची भूमिका आणि त्याच्या आयुष्याशी निगडीत काही व्यक्तिरेखांच्या भूमिका जवळ जवळ पक्क्या झाल्या आहेत. नुकतेच या चित्रपटात संजूबाबाच्या आईच्या म्हणजेच स्वर्गीय अभिनेत्री नर्गिस यांच्या भूमिकेत मनिषा कोइराला दिसणार असल्याचे निश्चित झाले. तर संजय दत्तच्या वडिलांची म्हणजे सुनील दत्त यांची भूमिकेत परेश रावल दिसणार आहेत. सुनील दत्त यांच्या भूमिकेसाठी बॉलिवूडचा दादा जॅकी श्रॉफ याचे स्क्रिन चाचणी झाल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर अक्षय खन्ना त्यांची ही भूमिका साकारणार असेही बोलले गेले होते.

दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या भूमिका करण्यासाठी अनेक दिग्गज कलाकार उत्सुक असताना खुद्द संजय दत्तच्या मनातही वडिलांची भूमिका स्वत: करावी असा विचार आला होता. माझ्या वडिलांच्या भूमिकेला माझ्या शिवाय कोण न्याय देऊ शकणार नाही, अशी संजय दत्तची भावना होती. मात्र काही काळानंतर संजय दत्तने त्याच्या डोक्यातील विचार काढून टाकला. बॉलिवूडमध्ये रंगणाऱ्या चर्चेनुसार, संजय दत्तने या चित्रपटासाठी सर्वाधिक वेळ दिला आहे. तब्बल २०० तासाहूनही अधिक वेळ त्याने दिग्दर्शक हिरानी यांना दिल्याचे समजते.

राजकुमार हिरानींचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती संजय दत्त, हिराणी आणि विधू विनोद चोप्रा हे संयुक्तरित्या करणार आहेत. संजय दत्तवरील बायोपिकच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली आहे. या चित्रपटात बॉलीवूडचा हॅण्डसम हंक रणबीर कपूर हा संजूबाबाची मुख्य भूमिका साकारणार आहे. तर चित्रपटात सोनम कपूर आणि अनुष्का शर्मा यांच्या मुख्य भूमिका असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. अनुष्का यात पत्रकाराची तर सोनम ही संजूबाबा प्रेमात पडलेल्या त्याच्या एका प्रेयसीची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. अभिनेत्री दिया मिर्झाची देखील या चित्रपटात वर्णी लागली आहे.