दिलीप ठाकूर
अनेक प्रकारचे अडथळे आणि आव्हाने येऊनही आजही आपली मागणी व लोकप्रियता कायम टिकवू शकलेल्या स्टारच्या आयुष्यावर आधारित चित्रपट निर्माण करणे आव्हानात्मक तितकीच ती भूमिका चक्क दुसर्‍याच कलाकाराने साकारणे नवलाचे!

संजय दत्तलाच ‘नायक’पद देऊन ‘संजू’ चित्रपटाची निर्मिती करणे सोपे होते. संजूचे लहानपणापासूनची छायाचित्रे, ‘रॉकी’ या पहिल्या चित्रपटापासूनची अनेक चित्रपटातील महत्त्वाची दृश्ये, प्रीमियर खेळ, पार्टी, इव्हेंट्स यामधील संजूचे फुटेज, त्याच्या कॉन्ट्रोव्हरसीजच्या बातम्यांचे मथळे, त्या घटनांचे वृत्त वाहिन्यांकडील फुटेज हे सगळेच एकमेकांत गुंतवताना एखादा कल्पक पटकथाकार तीन तासाचा चित्रपट लिहू शकला असता आणि तेवढाच कसबी दिग्दर्शक हे सगळेच प्रभावीपणे पडद्यावर आणू शकला असता. आणि त्यासाठी खर्चही कमी आला असता.

दिग्दर्शक राजकुमार हिरानीने हा सोपा मार्ग स्वीकारण्याऐवजी रणबीर कपूरकडून ‘संजू’ साकारायचे आव्हान उचलले. आणि ‘संजू’चा ट्रेलर पाहताना दोघेही ‘संजय दत्तचे वादळी तरी भावुक व्यक्तिमत्व’ पेलू शकलेत असे दिसतेय. ट्रेलरला जबरा प्रतिसाद मिळतोय हे संजय दत्तचे यश की हिरानी-रणवीरचे हा प्रश्न पडू शकतो.

सुनील दत्त व नर्गिस यांचा हा पुत्र चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वीपासूनच वादग्रस्त. पण तो तसा का बरे झाला यावर क्वचितच फोकस पडलाय. यातील या चित्रपटात नेमके काय व कसे येणार अथवा दिसणार याचे कुतूहल आहेच. तो शाळेत असतानाच त्याच्या आईचे फार पूर्वी राज कपूरशी असलेल्या विशेष संबंधावरुन त्याला छेडले जाई अशी गॉसिप्स मॅगझिनमधून चर्चा झाली. तो चित्रपटसृष्टीत आला तेव्हा टीना मुनिमचा प्रियकर म्हणून ओळखला गेला. त्यांच्या संबंधांचा ‘रॉकी’मधील प्रेम दृश्य खुलण्यात फायदा झाला, पण मोटारसायकलवर हे दोघे ओलेत्या रुपात असल्याचे मरीन ड्राइव्हवरील पोस्टर तात्कालिक पोलिसांनी उतरवायला लावले. ‘रॉकी’ प्रदर्शित व्हायच्या पाचच दिवस अगोदर नर्गिसचे दुर्दैवाने निधन झाल्याने ताडदेवच्या गंगा चित्रपटगृहातील प्रीमियरच्या वेळेस दत्त पिता-पुत्रांमधील खुर्ची रिकामी ठेवून नर्गिसला श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. तर  नर्गिसच्या श्रध्दांजली सभेत संजूचा अचानक तोल गेला असता उपचार योग्य झाले नसल्याचे त्याने सांगितले होते.

सुरुवातीच्या अनेक  चित्रपटात तो आत्मविश्वास हरवल्यासारखा वावरताना दिसला. तो अंमली पदार्थाच्या विळख्यात सापडल्याची बरीच चर्चा झाली. असा पूर्णपणे नकारात्मक गोष्टी असणारा कलाकार कालांतराने चक्क प्रेक्षकप्रिय ठरला. हा बदल अजिबात सोपा नाही. संजू विवाहित असूनही त्याचे माधुरी दीक्षितशी नाव जोडले जाणे, आपली पत्नी रिचा शर्मा अमेरिकेत कॅन्सरग्रस्त असतानाच मुलगी त्रिशालाच्या पालनचा प्रश्न, रिचाच्या निधनाचा धक्का… संजूच्या आयुष्यात प्रचंड चढउतार व नाट्य जे पचवून तो पुन्हा पुन्हा कसा बरे उभा राहिला हे त्याच्या चाहत्यांना चित्रपटातून जाणून घ्यायला आवडेल. पण रणबीर कपूरमध्ये हे सगळेच कसे उतरलयं याचे ट्रेलरमधून मिळणारे उत्तर तरी सकारात्मक आहे.

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून संजूला झालेली अटक त्याला देशद्रोही ठरवणारी पण तरीही त्याची लोकप्रियता कायम कशी याचे उत्तर कधीच सापडले नाही. त्याच्या अटकेची वादळ घोंघावत असतानाच त्याचा सर्वाधिक महत्त्वाचा चित्रपट ‘खलनायक’ प्रदर्शित होऊन सुपर हिट ठरला. नव्वदच्या दशकात तो दोनदा गजाआड होता. पण परतल्यावर त्याने आपले स्थान मिळवले. दुसऱ्यांदा तो जेलबाहेर आला तेव्हा दिवाळीच्या दिवशीच  मरीन ड्राइववरील एका तारांकित हॉटेलमध्ये आम्हा काही सिनेपत्रकारांना त्याची भेट घडवून आणली तेव्हाचा संजू पाहवत नव्हता. त्याचे वजन व चेहरा हे दोन्ही उतरले होते. नजरेत भकासपणा होता. यातून तो सावरणे अवघड असेच वाटले. पण काही महिन्यांतच त्याने आपली तब्येत व मागणी कमावली.

संजू चित्रपटात नेमके काय काय असणार? स्टुडिओतील संजू किती व येरवडा जेलमधील किती? सेटवर संजू कॅमेरा स्वीच ऑन व ऑफ खूप चांगल्या प्रकारे सांभाळतो हे महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वास्तव’च्या सेटवर प्रत्यक्ष अनुभवता आले. इतर वेळेस कमालीचा नार्मल असणारा संजू कॅमेरा ऑन होताच भूमिकेत शिरतो हे ‘हत्यार’च्या सेटवर दिग्दर्शक जे. पी. दत्ताने आवर्जून दाखवले. राजकुमार हिरानीने संजूसोबत ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ व त्याचा पुढचा भाग ‘लगे रहो मुन्नाभाई’ असे दोन स्वच्छ मनोरंजक चित्रपट दिग्दर्शित केल्याने व्यक्ती म्हणून तो कसा आहे याची आलेली बरीच कल्पना ‘संजू’ चित्रपटासाठी उपयोगात आली असेलच.

एकेकाळी नर्गिस आर. के. फिल्मच्या चित्रपटाची हुकमी नायिका होती. तो खंडित झालेला प्रवास या चित्रपटाच्या निमित्त जागा होतोय. संजय दत्तला राजीव कपूर दिग्दर्शित ‘प्रेमगंथ’ (१९९६) साठी करारबद्ध केले तेव्हाही या गोष्टींची बरीच चर्चा रंगली. जुही चावला त्यात त्याची नायिका होती. पण संजूला यावेळेस दुसर्‍यांदा गजाआड जावे लागताच ऋषि कपूर या चित्रपटाचा नायक झाला तर आता जुही बिझी झाल्याने माधुरी दीक्षितची निवड झाली.

संजूची पडद्यावरील व मागची अशी दोन्हीतील वाटचाल अनेक रोचक, रंजक आणि नाट्यमय घटनांनी भरलीय. ‘संजू’त त्यातील कोणते व किती रंग रणवीर कपूरला पेलवलेत हे पाहाणे उत्सुकतेचे ठरेल. सध्या चित्रपटाच्या ट्रेलरने अपेक्षा उंचावल्या आहेत.