संजय लीला भन्साळी यांचा आगामी चित्रपट ‘पद्मावती’ गेल्या बऱ्याच दिवसांपासून विविध अडचणींमध्ये सापडत आहे. काही धार्मिक संघटनांचा विरोध, चित्रपटाच्या कथानकांमध्ये होणारे बदल आणि कलाकारांच्या तारखा जुळवत भन्साळींच्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु झालं खरं. पण, या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख मात्र सारखी लांबणीवर पडत होती. आता मात्र या चित्रपटाच्या वाटेतील विघ्न दूर झाल्याचं म्हटलं जातंय.

‘पद्मावती’ चित्रपटाशी संलग्न सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १७ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार असल्याचं कळतंय. काही कारणांनी ‘पद्मावती’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली असल्याचं म्हटलं जात होतं. पण, तसं काहीही नसल्याचं सूत्रांनी स्पष्ट केल्यांचं वृत्त ‘बॉलिवूड हंगामा’ने प्रसिद्ध केलं. आतापर्यंत चित्रपटाचं चित्रीकरण ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे पार पडत आहे. किंबहुना दीपिका आणि शाहिद सुट्टीवर गेले नसते तर ठरलेल्या तारखेलाच चित्रीकरण पूर्ण झालं असतं असंही म्हटलं जात आहे.

https://www.instagram.com/p/BWRMGS9h5AW/

वाचा : माहेरचा गणपती : मालवणी भाषा एवढी ऐकायचे की ती वर्षभर पुरायची- नेहा राजपाल

चित्रपटाच्या अगदी शेवटच्या टप्प्याचं चित्रीकरण बाकी असल्यामुळे भन्साळींनी या दोन्ही कलाकारांना ते पूर्ण करुनच सुट्टीवर जाण्याची विनंती केली होती. पण, शाहिद आणि दीपिकाच्या आग्रहाखातर भन्साळींनी त्यांना सुट्टी देऊ केली. चित्रपटाचं आतापर्यंत ९५% चित्रीकरण पूर्ण झालं असून, तो ठरल्या तारखेलाच प्रदर्शित होईल अशी माहिती सूत्रांनी दिली. बॉलिवूडमध्ये आतापर्यंत सर्वाधिक स्क्रीन्समध्ये प्रदर्शित होणारा ‘पद्मावती’ हा पहिलाच चित्रपट ठरणार असल्याचंही म्हटलं जातंय. रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि शाहिद कपूर यांच्या या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिका असल्यामुळे सध्या त्यांच्या भूमिकांबद्दलही प्रेक्षकांमध्ये कुतूहल पाहायला मिळत आहे.