संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ सिनेमाची अधिकृत तारीख निश्चित करण्यात आली आहे. वायकॉम १८ ने याबाबद अधिकृत माहिती देत हा सिनेमा २५ जानेवारीला प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले आहे. हिंदी, तमिळ आणि तेलगु या तीन भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितली आहे. सेन्सॉर बोर्डाने पाच बदलांसह सिनेमाला यू/ए सर्टिफिकेट दिले आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलांना हा सिनेमा पाहता येणार नाही.

‘पद्मावत’ हा देशातला पहिला सिनेमा आहे जो आयमॅक्स ३डी हिंदीमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच सेन्सॉर बोर्डाच्या आदेशानुसार, निर्मात्यांना सिनेमाचे नाव बदलण्यास सांगण्यात आले होते. यानंतरच निर्मात्यांनी ‘पद्मावती’ हे नाव बदलून ‘पद्मावत’ केले. फेसबुकवरही या सिनेमाचे नाव बदलून पद्मावत केले.

https://www.instagram.com/p/Bd7hj-4BqLy/

वायकॉम १८ मोशन पिक्चरचे सीओओ अदीत अंधारे म्हणाले की, ”पद्मावत’ ही आमची एक चांगली कलाकृती आहे. राजपूतांच्या शौर्याला आम्ही दिलेला हा अनोखा सलाम आहे. या सिनेमाची निर्मिती एवढ्या मोठ्या प्रमाणात केली गेली आहे की मोठ्या पडद्यावर हा सिनेमा पाहणं ही एक मेजवानीच असेल. संपूर्ण जगात आणि भारतात २डी, ३डी आणि आयमॅक्स ३डी मध्ये हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे.’

‘सिनेमाच्या दिग्दर्शनात संजय लीला भन्साळी यांची आगळी वेगळी शैली दिसते. त्यामुळे सिनेमाची प्रत्येक फ्रेम मनात घर करुन जाते. जगभरात २५ जानेवारीला हा सिनेमा जेव्हा प्रदर्शित होईल तेव्हा भारतीय सिनेमांच्या इतिहासात या सिनेमाची नोंद केली जाईल एवढे नक्की.’

https://www.instagram.com/p/Bd7rHD3HqnR/

दरम्यान, अनेक राज्यांमध्ये या सिनेमाच्या प्रदर्शनाला तीव्र विरोध केला जात आहे. चित्तोडगढ येथील महिलांनी सरकारला धमकी दिली आहे की, जर ‘पद्मावत’ सिनेमा प्रदर्शित झाला तर महिला तिथल्या किल्यांमध्ये जाऊन जौहर करतील. चित्तौडगढ येथे झालेल्या सर्वसमाज बैठकीमध्ये सदस्यांनी या सिनेमाच्या प्रदर्शनाला तीव्र विरोध दर्शवला. या बैठकीत सुमारे ५०० लोक सहभागी झाले होते. यात उच्चभ्रू परिसरातील १०० महिलाही उपस्थित होत्या.

राजपूत करणी सेनेचे प्रवक्ते वीरेंद्र सिंहने प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, ‘१७ जानेवारीला चित्तोडगढ येथून जाणारा राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे मार्ग बंद करण्यात येतील. एवढं करुनही जर सिनेमा प्रदर्शित करण्यात येत असेल तर क्षत्रिय समाजातील महिला २४ जानेवारीला जौहर करतील. याच दिवशी राणी पद्मावतीनेही जौहर केले होते.’