दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘पद्मावत’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ आली असली तरीही सध्या त्याविषयी बरीच सतर्कता पाळण्यात येत आहे. सहसा एखादा चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख निश्चित झाल्यावर त्या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी कलाकार जास्तीत जास्त वेळ देतात. विविध कार्यक्रमांना हजेरी लावतात. पण, ‘पद्मावत’च्या बाबतीत तसे काहीच घडताना दिसत नाहीये. कारण, रणवीर, दीपिका आणि शाहिद त्यांच्या या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करणार नसल्याचे वृत्त समोर आले आहे. कोणत्याही प्रकारच्या वादाला तोंड फुटू नये आणि परिस्थिती आणखी चिघळू नये, यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचे कळते.

‘मिड डे’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार दिवसागणिक वाढणारे वाद पाहता परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठीच निर्मात्यांनी हा निर्णय घेतल्याचे कळते. काही दिवसांपूर्वीच निर्मात्यांनी चित्रपटातील कलाकारांना ‘पद्मावत’विषयी कोणतेही वक्तव्य करण्यास मनाई केल्याची माहिती सुत्रांनी दिली. राजपूत करणी सेनेचा चित्रपटाला असणारा विरोध पाहता येत्या काही दिवसांमध्येसुद्धा ‘पद्मावत’च्या प्रसिद्धीची फार हवा पाहायला मिळणार नसल्याचे म्हटले जातेय.

पाहा : Throwback Thursday : जुन्या जाहिरातींचा खजाना

सध्याच्या घडीला भन्साळींचा हा बिग बजेट चित्रपट मध्यप्रदेश, राजस्थान आणि हरयाणा या राज्यांमध्ये प्रदर्शित होणार नसल्याचे चित्र आहे. २५ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या वाटेतील अडथळे कमी होत नसल्यामुळेच आता निर्मात्यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ‘पद्मावत’मधून मध्यवर्ती भूमिका साकारणारे चेहरे या चित्रपटाचे प्रमोशन करणार नसले तरीही एकंदर वातावरण पाहता या चित्रपटाची सर्वत्र हवा पाहायला मिळतेय. त्यामुळे एका अर्थी चर्चांचे उधाण, चित्रपटाला होणारा विरोध या साऱ्यामुळे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे हे मात्र नाकारता येणार नाही.