संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावती या चित्रपटाला देशभरातून होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली होती. एक डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. अनेकांनीच या चित्रपटाच्या प्रदर्शन तारखेवरून तर्क-वितर्क लावले. पण तो नेमका कधी प्रदर्शित होणार हे स्पष्ट होत नव्हते. ‘बॉलिवूड हंगामा’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार पुढच्या वर्षी जानेवारीत हा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

दि. २६ जानेवारीला ‘पद्मावती’ हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी अक्षय कुमारचा ‘पॅडमॅन’ हा चित्रपटसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, निर्मात्यांकडून प्रदर्शनाच्या अधिकृत तारखेबाबत अद्याप घोषणा झाली नसली तरी २६ जानेवारी ही तारीख त्यांनी ठरवली आहे. आता ‘वायकॉम १८’ यासंदर्भातील अधिकृत घोषणा कधी करणार याकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलं आहे.

वाचा : बिहारमध्येही ‘पद्मावती’वर बंदी; मुख्यमंत्री नितीश कुमार यांची घोषणा

तांत्रिक बदलांची कारणे देत सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपट निर्मात्यांकडे परत पाठवला होता. त्यानंतर प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याची घोषणा करण्यात आली. तर राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशनंतर आता बिहारमध्येही ‘पद्मावती’च्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे.