कलाविश्वातील प्रसिद्ध आणि नावाजलेलं व्यक्तीमत्त्व म्हणजे चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी. आजवर अनेक ऐतिहासिक चित्रपट तयार करुन भन्साळी यांनी जणू कलाविश्वात एक इतिहासच रचला आहे. त्यांच्या चित्रपटातून जणू इतिहासच पुन्हा जिवंत होतो असं म्हटलं जातं. त्यामुळे त्यांच्या चित्रपटांची प्रेक्षक कायमच आतुरतेने वाट पाहत असतात. सध्या भन्साळी त्यांच्या आगामी ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. परंतु, या चित्रपटाव्यतिरिक्त ते लाहोरच्या रेड लाईट एरिया हिरा मंडीवर आधारित एक चित्रपट करणार असल्याचं ‘पिपिंगमून’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

पाकिस्तानच्या लाहोरमध्ये असलेला हिरा मंडी हा रेड लाईट एरिया कायमच चर्चेत राहिला आहे. त्यामुळे या विषयावर आधारित चित्रपट करण्याचा निर्णय संजय लीला भन्साळी यांनी घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

वाचा : राणी मुखर्जीपासून ते कतरिनापर्यंत; ‘या’ व्यक्तीच्या तालावर नाचतात बॉलिवूड अभिनेत्री

हिरा मंडीवर आधारित चित्रपट हा एक पीरियड ड्रामा वेब असून हा वेब चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. २०२१ मध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या नव्या वर्षातच चित्रपटाची अधिकृतरित्या घोषणा केली जाईल असंही सांगण्यात येत आहे.

दरम्यान,भन्साळींसाठी हा महत्त्वाचा प्रोजेक्ट असणार आहे. परंतु, याचं दिग्दर्शन मात्र ते करणार नसून विभू पुरी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच हिरा मंडी आणि गंगूबाई काठियावाडी हे दोन वेगवेगळे चित्रपट आहेत.