कलाविश्वामध्ये सध्या बायोपिकची चलती आहे. बायोपिकच्या या ट्रेण्डमध्ये आतापर्यंत अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या जीवनावर आधारित चित्रपटांची निर्मिती करण्यात आली. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला आहे. विवेक ऑबेरॉय याची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाली. मात्र आता पुन्हा एकदा नव्या रुपामध्ये पंतप्रधान मोदी यांचा जीवनप्रवास उलगडण्यात येणार आहे. चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी मोदींच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

‘हिंदुस्तान टाईम्स’नुसार, १७ सप्टेंबरला पंतप्रधान मोदी यांचा ६९ वा वाढदिवस असल्यामुळे या दिवशी दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या हस्ते या चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण करण्यात येणार असल्याची घोषणा संजय लीला भन्साळी यांनी केली होती. विशेष म्हणजे हा चित्रपट केवळ १ तासाचा असून ‘मन बैरागी’ असं या चित्रपटाचं नाव आहे.

या चित्रपटाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या प्रसंगावर भाष्य करण्यात येणार आहे. “या चित्रपटासाठी आम्ही प्रचंड मेहनत घेतली असून यापूर्वी कधीही न पाहिलेली पंतप्रधान मोदींची बाजू या चित्रपटात पाहायला मिळणार आहे”, असं भन्साळी म्हणाले. दरम्यान, या चित्रपटाची कथा संजय त्रिपाठी यांनी लिहिली असून दिग्दर्शनही त्यांनीच केलं आहे.