सुभाष घईचा ‘मुक्ता आर्टस’चा ‘खलनायक’ १९९३ या चित्रपटाची आता संजय लीला भन्साळी रिमेक करीत असल्याची बातमी एव्हाना तुमच्यापर्यंत पोहचली आहे. त्या निमित्ताने ‘खलनायक’चा वेगळा फ्लॅशबॅक तुम्हाला सांगायची सोनेरी संधी प्राप्त झाली आहे. तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, पण सुभाष घईने नाना पाटेकरला खलनायक करायचे ठरवले होते. तिसऱ्या बैठकीत घईच्या लक्षात आले की, या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचा हक्क नाना बजावेल, म्हणून त्याने यशस्वी माघार घेतली आणि पटकथेत मसालेदार फरक करत संजय दत्तची निवड केली.

या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी संजूबाबा आणि माधुरी दीक्षित यांचे रिश्ते-नाते प्रचंड घट्ट झाल्याचे गॉसिप पिकले. संजूची पत्नी रिचा शर्मा त्यावेळी अमेरिकेत कर्करोगाशी झुंज देत होती. सुभाष घईने त्यावेळी एका गॉसिप मॅगझिनला मुलाखत देताना म्हटले, काही झाले तरी संजू-माधुरी लग्न करणार नाहीत. (येथेही दिग्दर्शक दिसतो असे म्हणता येत नाही.) चित्रपटाची पूर्वप्रसिध्दी सुरू होताना, ‘चोली के पिछे क्या है’ हा मुखडा ऐकूनच कल्चरल शॉक बसला. (ही गीतरचना आनंद बक्षीची होती आणि संगीत लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचे होते) माधुरी दीक्षितने अशा गीतावर ‘ठुमका’ लावावा हे धक्कादायक होते.

याच गदारोळात मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील एक आरोपी म्हणून संजय दत्तला अटक होताच खळबळ उडाली आणि त्या घटनेचा संदर्भ या चित्रपटाच्या नावाशी जोडला गेला. या वादळात चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले आणि तो ऑगस्टमध्ये प्रदर्शित झाला. ‘राजकमल स्टुडिओत’ समिक्षकांसाठी ठेवलेल्या खेळाला चित्रपटाची प्रिंन्ट दीड तास उशीरा आली. पण चित्रपटाबाबत उत्सुकतापूर्ण वातावरण असल्याने आम्ही गप्प राहिलो. तेव्हा ‘मेट्रो’ हे या चित्रपटाचे मुख्य चित्रपटगृह होते. चित्रपटाचा मसाला फारसा न रंगल्याने यशाला मर्यादा पडल्या. संजय लीला भन्साळीच्या खलनायक च्या रिमेकमध्ये काय बरे दिसेल?