तब्बल वीस वर्षांनंतर निर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि अभिनेता सलमान खान एकत्र काम करणार होते. ‘इन्शाअल्लाह’ हा चित्रपट पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता. मात्र अचानक भन्साळी यांनी या चित्रपटातून काढता पाय घेतला. सोमवारी भन्साळी आणि सलमान खान यांनी ट्विटरच्या माध्यमातून चित्रपटाविषयी घोषणा केली आणि चाहत्यांना धक्काच बसला.

‘भन्साळी प्रॉडक्शन्स आता इन्शाअल्लाह या चित्रपटासाठी काम करणार नसून याबाबत पुढील माहिती लवकरच देण्यात येईल. देवाची इच्छा,’ असं ट्विट भन्साळी प्रॉडक्शन्सकडून करण्यात आलं. त्यानंतर सलमाननेही या चित्रपटाबाबत ट्विट केलं. ‘संजय लीला भन्साळी यांच्यासोबतचा चित्रपट पुढे ढकलण्यात आला आहे पण २०२०च्या ईदला मी तुमच्या भेटीला नक्की येईन. इन्शाअल्लाह,’ असं सलमान त्याच्या ट्विटमध्ये म्हणाला. सलमान व भन्साळी यांच्यात चित्रपटाच्या कथेवरून मतभेद असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

आणखी वाचा : हा अभिनेता होता करीनाचा क्रश; रिअॅलिटी शोमध्ये सांगितली ‘दिल की बात’

‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीत सलमान याविषयी म्हणाला, ”खामोशी चित्रपटात काम करण्यापूर्वीपासून माझी भन्साळींशी मैत्री आहे. त्यानंतर आम्ही हम दिल दे चुके सनम चित्रपटासाठी एकत्र काम केलं. जेव्हा ते माझ्याकडे हा (इन्शाअल्लाह) चित्रपट घेऊन आले तेव्हा मला त्याची स्क्रीप्ट फार आवडली आणि मी काम करण्यास होकार दिला. एक गोष्ट मी खात्रीने सांगू शकतो की ते या चित्रपटाशी गद्दारी करणार नाहीत. त्यांना जसा चित्रपट साकारायचा आहे तसा तो त्यांनी करावा. याचा परिणाम आमच्या मैत्रीवर होणार नाही आणि त्यांच्याही मनात माझ्याविषयी कटूता नसेल याची मला खात्री आहे. भविष्यात आम्ही एकत्र नक्कीच काम करू.”

सलमान व भन्साळी यांच्या मतभेदाचा फटका अभिनेत्री आलिया भट्टलाही बसला आहे. कारण ती पहिल्यांदाच भन्साळींच्या चित्रपटात काम करणार होती. सध्या तरी प्रेक्षकांना भन्साळींसोबतचा सलमानचा चित्रपट पाहण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.