अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या ‘संजू’ या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे. अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित कथानक असणाऱ्या या चित्रपटातून रणबीर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. रणबीरने त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत अशा काही भूमिका साकारल्या आहेत. त्यातील काही भूमिकांना प्रेक्षकांनी पसंती मिळाली तर, काही भूमिकांनी मात्र रणबीरच्या वाटेला अपयश आलं.

यश असो वा अपयश रणबीरने त्याच्या प्रत्येक भूमिकेमध्ये वेगळेपण जपलं. हेच वेगळेपण जपण्यासठी त्याने एक सुरेख अशा मार्गाचा अवलंब केला, ज्याचा त्याने नुकताच एका मुलाखतीत उलगडा केला. एका मुलाखतीत रणबीर म्हणाला, ‘एखाद्या गोष्टीचा सुवास मला लगेचच येतो. मुख्य म्हणजे संवेदना कोणतीही असो, मग तो स्पर्श असो किंवा आणखी कोणती संवेदना. तुम्हाला त्या संवेदनेचा एखादी भूमिका, व्यक्तीरेखा लक्षात ठेवण्यासाठी मदत होतेय, तर ही खुपच चांगली गोष्ट आहे. असं म्हणत आपण प्रत्येक भूमिकेसाठी वेगवेगळ्या परफ्यूमचा वापर करत असल्याचा खुलासा त्याने केला. ”बऱ्याचदा असं होतं, की तुम्ही एकाच वेळी दोन वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम करत असता. जसं मी ‘वेक अप सिड’ आणि ‘अजब प्रेम की गजब कहानी’, या दोन्ही चित्रपटाचं चित्रीकरण एकाच वेळी करत होतो”, असं तो म्हणाला.

वाचा : Alia Bhatt-Ranbir Kapoor: आलिया- रणबीरच्या रिलेशनशिपविषयी काय म्हणाली पूजा भट्ट?

आपल्या चित्रपटांच्या चित्रीकरणात आणि भूमिकांमध्ये वेगळेपण जपण्यासाठी याच एका गोष्टीची आपल्याला मदत झाली होती, असंही त्याने या मुलाखतीत स्पष्ट केलं. ”वेक अप सिड या चित्रपटातील भूमिका लक्षात ठेवण्यासाठी माझ्याकडे एक वेगळा परफ्यूम होता. तर, ‘अजब प्रेम की गजब कहानी’तील भूमिकेसाठी वेगळा. ज्यावेळी मी हे परफ्यूम लावून कारच्या बाहेर यायचो तेव्हा माझ्या लक्षात असायचं की त्या क्षणी आपण नेमके कोणत्या भूमिकेत आहोत. बऱ्याचदा मी विविध भूमिकांसाठी वेगळे शूज घालण्यालाही प्राधान्य दिलं होतं”, हे त्याने सांगितलं.

प्रत्येक भूमिकेचं वेगळेपण जपण्यासाठी कलाकार विविध मार्गांनी काही मार्गांचा अवलंब करत असतात. पण, ‘संजू’ फेम रणबीरचा हा अनोखा मार्ग सध्या बराच चर्चेत आहे.