यंदाच्या वर्षी आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये सर्वाधिक कमाई करत ‘संजू’ने बाजी मारली आहे. रणबीर कपूरची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केलं असून, या चित्रपटानंतर आता रणबीरच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने एक कलाटणी मिळाली आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे सर्वाधिक कमाई करणारा ‘संजू’ आता परदेशवारीवर जाणार असल्याचं दिसून येत आहे.

‘टाईम्स ऑफ इंडिया’नुसार, संजूने ३०० कोटींचा टप्पा गाठला असून हा चित्रपट आता लवकरच अन्य देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. संजयच्या बायोपिकने देशामध्ये मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घातला असून हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत आहे. त्यामुळेच हा चित्रपट अन्य देशांमध्ये प्रदर्शित व्हावा अशी चित्रपटाच्या संपूर्ण टीमची इच्छा आहे.

‘संजू’ हा चित्रपट आशियाई देशांमध्ये प्रदर्शित व्हावा यासाठी फॉक्स स्टार स्टुडिओ प्रयत्न करत असून हा चित्रपट प्रथम चीनमध्ये प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.  त्यामुळे लवकरच हा चित्रपट चीनच्या नागरिकांना पाहता येणार आहे.

दरम्यान, ‘संजू’ भारतामध्ये ४ हजार १०० स्क्रिनवर प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटामध्ये रणबीर कपूर संजयच्या भूमिकेमध्ये झळकला असून या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिल्याचं दिसून आलं. त्यामुळेच हा चित्रपट अन्य देशातील नागरिकांना पाहता यावा यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले असून यासाठी चीनमधील अनेक वितरकांशी या चित्रपटाविषयी चर्चा करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.