राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘संजू’ चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला असून या चित्रपटाने नुकताच ३०० कोटींचा गल्ला जमवला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले तरीदेखील त्याची लोकप्रियता यत्किंचितही कमी झालेली नाही. अद्यापही प्रेक्षकांचा ओघ या चित्रपटाकडे वळताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील रणबीर कपूरचे ८ लूक्स सध्या चांगलेच गाजतायत. रणबीरचे हे लूक डिझाइन करण्यामागे दोन मराठी माणसांचा हात असून या कलाकरांनी आतापर्यंत अनेक कलाकरांचे उत्तम लुक्स केले आहेत.

‘संजू’मध्ये रणबीर हुबेहूब संजय दत्तप्रमाणे दिसावा यासाठी सुरेंद्र साळवी आणि जितेंद्र साळवी या मराठमोळ्या भावांडांचा हात असून त्यांनी रणबीरचा लूक केला आहे. त्यांच्या याच कलाकारीमुळे रणबीरचा हा लूक प्रचंड चर्चेत येत आहे. इतकंच नाही या चित्रपटातील परेश रावल, सोनम कपूर, अनुष्का शर्मा ह्यांचा लूक खूलवण्यामागे सुध्दा सुरेंद्र-जितेंद्र ह्या भावांचा सिंहाचा वाटा आहे. या दोन्ही भावंडांनी संजूच्या मुख्य स्टारकास्टासाठी वीग डिझाइन केले आहेत.

सुरेंद्र आणि जीतेंद्र साळवी यांनी ‘कुली’, ‘खुदा गवाह’, ‘बाजीराव-मस्तानी’, ‘३ इडियट्स’, ‘अग्निपथ’, ‘बाहूबली’, ‘पद्मावत’, ‘१०२ नॉट आउट’ अशा चारशेहून अधिक चित्रपटासाठी वीग डिझाइन केले आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, बॉलिवूडमध्ये गेली ३८ वर्ष काम करणा-या सुरेंद्र साळवी आणि १६ वर्ष काम करणा-या जीतेंद्र साळवी यांनी बॉलीवूडच्या ९५ टक्के चित्रपटांसाठी वीग डिझाइन केले आहेत. ‘कुली’ चित्रपटापासून सुरू झालेला हा प्रवास आता ‘संजू’पर्यंत अविरत सुरू आहे. सिनेमाच नाही तर अॅड फिल्मसाठीही ह्या भावांची ‘नॅचरल हेअर’ ही कंपनी विग डिझाइन करते.

दरम्यान, “काल्पनिक आणि ऐतिहासिक व्यक्तिंसाठी विग डिझाइन करणे सोपे असते. पण एखाद्या लिविंग लिजेंडसाठी लूक डिझाएन करणे हे आव्हानात्मक असते. पण मी सुनील दत्त आणि संजय दत्त ह्या दोघांसोबत काम केल्याने मला दोघांच्याही केसांचे स्ट्रक्चर माहित होते. त्यामुळे वीग डिझाइन करणे माझ्यासाठी सोपे झाले. आम्ही रणबीरसोबत १५ ते २० लुक्स ट्राय केल्यावर त्यातले आठ लूक्स राजू हिरानींनी फायनल केल्याचं सुरेंद्र साळवी यांनी सांगितलं.