अभिनेता संजय दत्त याच्या वादग्रस्त आयुष्यावर आधारित ‘संजू’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटातील ‘बाबा बोलता हा है’ या गाण्याचा व्हिडिओ टी सिरिजनं नुकताच प्रदर्शित केला आहे. या चित्रपटात सगळ्यात शेवटी दाखवण्यात आलेल्या गाण्यात रणबीरसोबत संजय दत्तही आहे. या गाण्याच्या माध्यमातून संजय आणि रणबीरनं पत्रकारांची शाळा घेतली आहे.

अनेक बातम्या देताना माध्यमं राईचा पर्वत करतात किंवा बरेचदा सुत्रांचा हवाला देतात. पण या गोष्टीमुळे एखाद्याचं सुरळीत सुरू असलेल्या आयुष्याची सर्कस होऊन जाते अशा मार्मिक शब्दात रणबीर आणि संजू बाबानं चुकीच्या बातम्या देणाऱ्या पत्रकारांची शाळा घेतली आहे. हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी यावर आक्षेपही घेतला आहे. संजय दत्तची प्रतिमा चांगली दाखवण्याचा पण त्याचबरोबर पत्रकरांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न या गाण्यातून केला असल्याचा आरोप काहींनी केला आहे.

२९ जूनला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं आतापर्यंत ७३ कोटींचा गल्ला जमावला आहे. रविवारपर्यंत हा चित्रपट १०० कोटींहून अधिक कमाई करेन अशा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे.