01 March 2021

News Flash

स्मिताचे कार्टे… – संकर्षण कऱ्हाडे

पाहुण्यांनी त्यांच्या मुलाला बेदम चोप दिला आणि मग घरी नेला.

लहानपणी मी आणि माझा भाऊ अधोक्षज; आम्ही खोडय़ा काढण्यात एकदम माहीर.

सेलिब्रिटी लेखक
संकर्षण कऱ्हाडे – response.lokprabha@expressindia.com

लहानपणी मी आणि माझा भाऊ अधोक्षज; आम्ही खोडय़ा काढण्यात एकदम माहीर. कोणत्या घरगुती कार्यक्रमात किंवा कुणाच्या घरी गेलो तर हमखास ‘आले बाबा स्मिताचे कार्टे’ असे दहशतीनेच अनेकांना म्हणलेलं आम्ही ऐकलंय.

आपण कळवळलो किंवा दुखलं की ‘आई ग्गं’ आणि घाबरलो की, ‘बाप रे’ हे नकळत आपल्याकडून बोललं जातं तसंच पोर जरा बिघडलं की; आईचं नाव घेऊन तिचं पोरगं पार वाया गेलं किंवा बिघडलं म्हटलं जातं. बरं निघालं तर, बापाचं नाव काढलं म्हणतात. का हा फरक आहे देव जाणे! मी मात्रं लहानपणच्या व्रात्यपणामुळे आईचा उद्धार आणि सध्या करत असलेल्या बऱ्या कामामुळे बापाचा उदोउदो या दोन्ही गोष्टी अनुभवतोय.

फार विचार करून संकर्षण आणि अधोक्षज ही भगवंताची नावं आम्हा भावंडांची आमच्या आई-बाबांनी ठेवली. आम्ही मात्र ही नावं असुरांची भासावी इतक्या दहशती- खोडय़ा लहानपणी केल्या. त्यातल्या त्यात मीच. माझा धाकटा भाऊ त्यात कायम भरडला गेला. आई-बाबा, आजी-आजोबा, मोठी ताई, मधला मी आणि धाकटा भाऊ असा परिवार असल्यामुळे प्रत्येकाकडे वेगळं डिपार्टमेंट होतं. बाबा त्यांची बँक आणि नाटकाच्या आवडीत व्यस्त आणि रमलेले. त्यातून मिळालेल्या वेळेत ते आमच्यासोबत असताना आम्ही गुणी असल्याचा इतका अभिनय करायचो की; आज वाटतं, तिथे खरी माझ्यातल्या अभिनेत्याची पाळंमुळं आहेत. तरीही कधी तरी त्यांच्या तावडीत सापडलोच तर त्या वेळी ज्या उत्स्फूर्त आणि गोड थापा मारायचो, तिथे माझ्यातल्या हजरजबाबी (लोक म्हणतात) निवेदनाचा पाया असावा.

आजी, आजोबांनी गावी नेणे, आइस्क्रीम आणणे, बागेत नेणे, गोष्टी सांगणे, आम्हाला आई-बाबा रागावले तर उलट त्यांनाच ओरडणे हे सगळे टिपिकल लाड करायचे. त्यामुळे त्यांनी काही रागावण्या-मारण्याचा प्रश्नच नव्हता. मोठी ताई दोनच वर्षांनी मोठी असल्याने तिला कायम आम्ही मोठी न म्हणता फक्त मोटी म्हणायचो, आदराने फार फार तर  गुड्डे. तिचं लग्नं होऊन दोन लेकरं आहेत तिला; पण आम्ही अजूनही गुड्डीच म्हणतो. माझ्या नादी लागून परवा तिची पाच वर्षांची मुलगी तिला गुड्डीच म्हणाली. आमचे भाऊजी म्हणत नाहीत हेच नशीब. राहिला प्रश्न आईचा; तर १८व्या वर्षीच तिचं लग्न झालं आणि त्यात धार्मिक, शिस्तबद्ध सासू-सासऱ्यांची मर्जी राखण्यात तिने स्वत:ला इतकं झोकून दिलं की; तिच्या हातचं पोटभर खाऊन सुदृढ राहण्यापलीकडे तिच्या हाताला आम्ही स्वत:ला लागूच दिलं नाही आणि या सगळ्यामुळे आमच्यातल्या व्रात्यपणाला पोषक वातावरण आम्हीच करवून घेतलं होतं.

मला आठवतं; घरी पाहुणे आले होते. जेवणाची पंगत बसली होती. आलेल्या पाहुण्यांच्या पोराला सहभागी करून आम्ही बठकीत क्रिकेट खेळायला लागलो. बॉल दारावर लागून एक आवाज झाला. तेव्हाच एक करडा आवाज आतून आला होता. पण त्याला न जुमानता आमचा खेळ चालूच होता. एकीकडे पंगत आणि इकडे आमची मॅच ऐन रंगात आलेली असताना मी बॉल आतल्या दिशेने मारला आणि तो बरोब्बर वरणाच्या वाटीवर लागून सगळं वरण त्यातल्या फळभाज्यांसह आमच्या आजोबांच्या आणि आलेल्या पाहुण्यांच्या अंगावर विभागून उडालं. जेवल्यावर सुस्ती आली की जेवण अंगावर आलं असं म्हणतात, पण वरण अंगावर आलं असं म्हणायची नामुष्की त्या दिवशी आम्ही आणली. वातावरण नॉर्मल होईपर्यंत मी आणि भावाने स्वत:ला घरातून तडीपार करवून घेतलं. भूक लागल्यावर जेव्हा घरी परत आलो तेव्हा कळलं की, पाहुण्यांनी त्यांच्या मुलाला बेदम चोप दिला आणि मग घरी नेला.

तसंच एकदा मला आणि माझ्या भावाला नवीन नवीन मुंज झालेली असल्याने कौतुकाने एका घरी जेवायला बोलावलं. जातानाच आईने ‘आगाऊपणा करू नका’ हे आमचा भांग पाडून देता देता सांगितलं होतं. तिथे पोहोचल्यावर पाहिलं तर, आमच्यासारखे अजून नऊ म्हणजे एकूण ११ बटू जेवायला होते. कलाकारी िपड असल्याने मला प्रेक्षकच मिळाले या भावनेने मी खूप खूश झालो आणि मनोरंजनाची जबाबदारी घेतली. आधी काकडीच्या कापांची फेकाफेकी करून मारामारी केली, मग केळीच्या पानांवर काडीने चित्रकला झाली. चित्रकलेमुळे वाढून व्हायच्या आधीच पानांमधून खालची फरशी दिसायला लागली होती. उत्साहात पंगत सुरू झाली आणि मला खूप तेलकट आणि तिखट ते जेवण नकोसं झालं. मी भावाला सांगितलं तर तो म्हणाला ‘शंक्या, गपचूप खा..’ मी खायचं नाहीवर ठाम होतो; पण ज्यांच्या घरी गेलो होतो ते काका एवढी मोठ्ठी ढेरी घेऊन ‘सग्गळं खा रे..’ सांगायला उभेच होते. मी शक्कल लढवली. वाढलेली पुरीभाजी बाजूच्या पोराच्या ताटात त्याच्या नकळत सरकवायला सुरुवात केली आणि उरलेली बसलो होतो त्याच चटईखाली लपवली. पान स्वच्छ केलं, ११ रुपये दक्षिणा घेऊन ढेकर दिल्याचा अभिनय केला आणि पटकन पेपर सोडवून बाहेर आल्याच्या थाटात बाहेर आलो. पुढे काय झालं देव जाणे, पण दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना पाहिलं तर, तीच चटई धुऊन बाहेर वाळायला ठेवली होती.

तसंच एकदा आजोबा भाजीच्या तीन-चार पिशव्या घेऊन सायकलरिक्षातून घरी आले. १५ रुपये तो घेणार होता यावरून आधीच त्यांच्यात आणि रिक्षावाल्यात किरकिर चालू होती. ‘एवढे पसे घेतोचेस तर, पिशव्या घरात आणून दे’ या नोटवर त्यांच्यात तह झाला. ते आत गेले आणि तेवढय़ा वेळात मी सायकलरिक्षा चालवायला घेतली. तीन चाकं असल्यामुळे पडायची भीती आणि विचारही डोक्यात आला नाही. भावाला म्हणलं धक्का दे. त्याने एवढा जोरदार दिला की, रिक्षा समोरच्या नालीत गेली, चाक वाकडं झालं, मी पडलो ते सोडाच, पण १५ रुपयांवरून चाललेली घासाघीस १५० रुपयांवर आली. सगळ्या गल्लीचा गोंधळ.

शाळेत आणि बाहेर व्हायच्या त्या वेगळ्याच खोडय़ा. चारच्या टय़ूशनला मी एका मित्राला हाताशी घेऊन नेहमी ४.१५ ला जायचो. एकदा जाताना हातात मोठ्ठे दोन दगड घेतले. जाईपर्यंत अर्थातच क्लास सुरू झाला होता. सरांना ‘आत येऊ’ असं विचारलं. त्यांनी आमच्याकडे पाहून ‘या’ म्हणून परत फळ्याकडे तोंड केलं. तेवढय़ा वेळेत आम्ही हातात लपवून आणलेले दगड उंच फेकून वेगाने शेवटच्या रांगेत जाऊन बसलो. काही सेकंदांनंतर फेकलेले दोन दगड टय़ूशनच्या खोलीच्या पत्र्यावर इतके जोरात आदळले की, सरांसह सगळे घाबरून हॉलच्या बाहेर आले. शहानिशा करण्यात १५ मिनिटं वाया गेली. आमचा उद्देश सफल झाला. आम्ही सलग तीन दिवस हे केलं. तिसऱ्या दिवशी सरांसह पोरांनाही कळालं की, हे आमचंच काम आहे. त्या दिवशी ‘आत येऊ’ हे विचारल्यावर सरांनी आधी मारलं आणि मगच आत घेतलं. आम्ही विचारलंही नाही का मारताय म्हणून!!

नाटकांत काम करतानाही या खोडय़ा अंगलट यायच्या. एका नाटकात मी, माझा भाऊ आणि अजून एक परभणीचा मुलगा आम्ही तीन बाल कलाकार होतो. त्या नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मुंबईत आलो. आमच्या खोडय़ांचा दर्जा लक्षात घेता दिग्दर्शकावर प्रयोग उत्तम होण्यापेक्षा तो होणे ही जबाबदारी जास्त होती. त्या तिसऱ्या पोराने मला आणि भावाला मुंबईकडे येण्याच्या प्रवासात खूप त्रास दिला आणि याचा बदला म्हणून आम्ही त्याला ऐन प्रयोगाच्या आधी बाथरूममध्ये कोंडलं. त्याची एन्ट्री आली तरी तो येईचना. दारावर थाप मारल्याचा आवाज स्टेजपर्यंत आला. आम्ही मात्र काहीही माहीत नसल्यासारखे बघत राहिलो. शेवटी चालू प्रयोगात एका नटाला एक्झिट घेऊन त्याला घेऊन यावं लागलं.

असं आमचं लहानपण आणि खोडय़ा. आवाज देऊन लोकांना थांबवणे आणि लपून बसणे, चिखलाचे छोटे गोळे पाठीवर चिकटवणे, सरांच्या गाडीच्या सायलेन्सरमध्ये केळे घालणे आणि त्यांची फजिती पाहाणे या व्रात्य खोडय़ा आम्ही अनेकदा केल्या. लग्नकार्यात, कुणाच्या घरी गेलो तर हमखास ‘आले बाबा स्मिताचे कार्टे’ असं दहशतीनेच अनेकांना म्हणलेलं आम्ही ऐकलंय. आमच्या बऱ्या वागण्यासाठी देवासमोर हात जोडलेलं आईला पाहिलंय आम्ही; पण त्या खोडय़ा या खोडय़ाच होत्या. आता आम्ही मोठे झालोय, एकमेकांसोबत प्रेमाने राहातो, आपापली कामं नेटाने करतो. प्रामाणिक आहोत. टीव्ही, नाटकातलं काम पाहून, वागणं पाहून आईबाबांना पावती दिली जाते. माझ्या नावाने बाबांना ओळखलं जातं. त्यांना फार भारी वाटतं. आईला माझी आई म्हणून प्रमुख परीक्षक म्हणून बोलावलं जातं. हे अनुभवताना त्यांना फार समाधान वाटतं.

खोडय़ा अंगात आहेतच, पण त्यांना मर्यादेची जाणीव, संस्कारांचं कुंपण आहे आणि भविष्यात कुणीही ‘आले बाबा स्मिताचे कार्टे’ हे दहशतीने आम्हाला म्हणण्यापेक्षा आदराने हे ‘संकर्षण अधोक्षजचे आई-बाबा आहेत’ असं त्यांना म्हणलं जावं, ही तीव्र इच्छा आहे.
सौजन्य – लोकप्रभा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2018 3:33 pm

Web Title: sankarshan karhade and his childhood pranks
Next Stories
1 एकता कपूरविषयीचं माझं मत चुकीच्या पद्धतीने मांडलं, ‘कुसूम’ फेम अभिनेत्रीची खंत
2 इतकी वर्षे बॉलिवूडमध्ये काम करुनही मला मैत्रीणच नाही – काजोल
3 …म्हणून रजनीकांत-अक्षयच्या ‘२.०’ या बिग बजेट चित्रपटाचा ट्रेलर १३ सप्टेंबरलाच होणार प्रदर्शित
Just Now!
X