24 November 2020

News Flash

सुपरस्टार ते देवाशप्पथ

मुंबईत यायचंय, अभिनय करायचाय हे अनेकांसारखं मलाही वाटतंच होतं.

मी रेवती देशपांडे नाटकातील दृश्य

सेलिब्रिटी लेखक
संकर्षण कऱ्हाडे – response.lokprabha@expressindia.com

आपण कुठल्याही यशस्वी व्यक्तीच्या यशाचा पाढा वाचताना ‘त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलंच नाही’ हे सर्रास म्हणतो. मला हे खोटं वाटतं. कारण, आपण सततच मागे वळून पाहतो म्हणून तर आपल्याला अजून काहीतरी हवंय असं सतत वाटत असतं आणि ते नेमकं काय हे माहीतही असतं.  शिवाय मागे वळून पाहिलंच नसतं तर सगळेच आहे त्यात सुखी राहिले असते. पण ठीके; मी अजून स्वत:ला यशस्वी समजत नाही त्यामुळे सतत मागे वळून पाहणं, जे चुकलंय ते पुन्हा नं होऊ देणं, जे बरोबर आहे, त्यात सातत्य राखून वृद्धी करणं हे माझं कर्तव्य आहे आणि असं करत राहण्याला सिंहावलोकन करणं असं माझे बाबा मला सतत सांगतात त्यामुळे मी मागे वळून पाहायला मोकळा आहे.

मी लहानपणापासून नाटकात काम करतच होतो. त्यामुळे मुंबईत यायचंय, अभिनय करायचाय हे अनेकांसारखं मलाही वाटतंच होतं. पण, ‘प्रत्येक गोष्टीची वेळ यायला लागते’ हे मोठय़ांनी सांगितलेलं अनेकांसारखं मलाही पटत नव्हतं. शेवटी, होतं तेच.

नोव्हेंबर २००८ साली मी पुण्यात डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये एमबीए मार्केटिंगच्या दुसऱ्या वर्षांला असताना झी मराठीच्या ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या स्पध्रेसाठी ऑडिशन दिली. पुण्यातून १२०० मुलांमधून त्यांनी १२ मुलं निवडली, त्यात मी होतो. पुढे पुढे या स्पध्रेत माझ्या लक्षात आलं की, फक्त  दिलेलं स्क्रिप्ट पाठ करून अभिनय करणं अपेक्षित नाहिये तर, तुम्ही तुमच्या हजरजबाबीपणाने, वागण्या-बोलण्याने, दिसण्याने, अभिनयासोबतच नकला, डान्स, लिखाण अशा मनोरंजनाशी निगडित अनेक गोष्टींमधून मनोरंजन करणं अपेक्षित आहे. त्यात त्या वेळी मी आत्ता आहे त्यापेक्षा खूपच मागे होतो.  अर्थातच मी या स्पध्रेच्या अंतिम फेरीपर्यंत पोचलो नाहीच. हां, पण या स्पध्रेच्या निमित्ताने एक ‘गॉडमदर’ मिळाली ती म्हणजे ‘झी मराठी’. मी हे असं म्हणण्यामागचं कारण पुढे लिहिनच.

काही एपिसोड्मध्ये मी दिसलो होतो. त्यात असा कार्यक्रम पहिल्यांदाच मराठीत झाल्याने जराशी ओळख मिळाली. पण, काम मिळणार कसं, हा विचार चालू असतानाच मी परत जाऊन कॉलेज जॉईन केलं. तेव्हा मला मिळालेलं पहिलं काम म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवर ‘स्वप्नांच्या पलिकडले’ ही मालिका. मी खूश. तीन दिवस शूट केलं आणि माझा पुढचा दिवस कधी लागणारे हे विचारायला म्हणून फोन केला तेव्हा ते म्हणाले ‘तुम्हाला जमत नाहिये फारसं काम.. तुम्हाला आम्ही काढून टाकलंय.’ केलेल्या कामाचे पसे घ्यावे म्हणून गेलो तर ठरलेल्या रकमेपेक्षा अध्र्याहून कमी किमतीचा चेक त्यांनी हातात ठेवला. इतकं वाईट वाटलं की, मी तिथेच रडायला लागलो. तो चेक मी परत केला आणि निघालो. त्या वेळी अभिनेते अशोक शिंदे मला जवळ घेऊन म्हणाले, ‘बेटा, देखो, एक दिन तू इन लोगों को ना बोलेगा.’ आणि खरंच पुढे तसं झालंही. पण त्या वेळी इतका निराश झालो की, परभणीला निघून गेलो आणि रागारागांत टक्कलच केलं. विचित्र दिसत होतो आणि चाराठ दिवसांत झी मराठीमधून फोन आला की, नवीन शो येतोय, अँकरिंगच्या ऑडिशनला ये. मला वाटलं उगाच कापले केस. तरीही आलो आणि पायलट एपिसोड शूट केला. खरंतर मी तो बरा केला होता पण, हे बेरूप पाहता मला घेणार नाहीतच हे मला माहीत होतं आणि तसंच झालं; आणखी वाईट वाटलं. पण, माझा प्रयत्न बरा असल्याने मला सारेगमपच्या ऑडिशनला रांगेत आलेल्या मुलांचे बाइट्स घेणे, ‘उत्सव नात्यांचा’ या नावाने झी मराठीच्या होणाऱ्या कार्यक्रमांचं निवेदन अशी कामं मिळायला लागली. त्यातनं थोडे पसेही. पण अभिनयाची हौस संपेना, अस्वस्थ झालो. तेव्हाच ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ मालिकेतल्या ‘चंदू’ या भूमिकेच्या ऑडिशनसाठी बोलावणं आलं. माझ्यासोबतच ऑडिशनला आलेल्या मुलाच्या तारखांचा घोळ होता म्हणून मला ती भूमिका मिळाली.

सुरुवातीच्या काही दृश्यांमध्ये मला ते पात्र करताच येत नव्हतं; मनातल्या मनात घाबरलो. तयारीतच होतो की इथूनही काढून टाकणार मला. पण, तसं नाही झालं. आणि मीही मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केला आणि चंदू हे पात्र लोकांच्या लक्षात राहिलं. हे काम चालू असतानाच झी मराठीवर ‘आभास हा’ ही मालिका मिळाली. या कामातून राहिलेल्या तारखांमध्ये त्या मालिकेचं काम व्हायचं. कुणीतरी आपल्या तारखा मागतंय याचा अतिशय आनंद झाला. आणि त्याहीपेक्षा आनंद झाला याचा की, आठ ते साडेआठ ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ आणि साडेआठ ते नऊ ‘आभास’ हा असा तासभर मी झी मराठीवर दिसायचो. दोन वेगळ्या भूमिकेतल्या कामांचं कौतुक व्हायला लागलं, गडी खूश.!! दरम्यान कळालं की, विनय आपटे नाटकासाठी तरुण मुलांच्या ऑडिशन्स घेतायेत. मी गेलो, माझी निवडही झाली आणि मला माझं पहिलं व्यावसायिक नाटक मिळालं. त्याचे फक्त २५ प्रयोग झाले आणि ते बंद पडलं. पण विनय आपटे अनुभवता आले. पुढे या दोन्ही मालिका बंद झाल्या. माझ्याकडे झी मराठीवर सकाळी आठ वाजता लागणाऱ्या ‘राम राम महाराष्ट्र’ कार्यक्रमाचं निवेदन आलं. त्याचं लिखाण मी स्वत:हून मागून घेतलं. मज्जा यायची वाढदिवसाचे पत्र वाचताना, अँकर लिंक्स लिहिताना. हा कार्यक्रम मी चार र्वष केला. हे करताना परत नाटक हवंसं वाटायला लागलं आणि शोधाशोध करून, गाठीभेटी घेऊन मला ‘मी रेवती देशपांडे’ हे चिंतामणी या संस्थेचं नाटक मिळालं. हा अनुभव वेगळाच होता. दोन महिने तालीम आणि ८-१० प्रयोगांनंतर मी मोहन जोशींचा मुलगा म्हणून लहान वाटतो हे कारण मला दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी दिलं आणि माझ्याकडचे प्रयोग काढून घेतले. माझं दुसरं व्यावसायिक नाटकही दहा प्रयोगांत बंद पडलं आणि पुढे ते नाटकही फार चाललं नाही.

हे सगळं होत असताना झी मराठीच्या ‘उत्सव नात्यांचा’, ‘चला खेळूया मंगळागौर’, ऑडिशन्स अशा अ‍ॅक्टिव्हिटीजच्या अँकिरगनी माझं अर्थार्जन थांबू दिलं नाही, पण मला आता अभिनयात ठोस काहीतरी हवं होतं. कारण, आधीच्या दोन्ही मालिकांत छोटय़ा छोटय़ा भूमिका होत्या. नाटकं चालली नाहीत आणि निवेदन हा आवडीचा प्रांत आहेच, पण आवड अभिनयची.! परत ऑडिशन्स, शोध सुरू झाला आणि परत संधी मिळाली झी मराठीवरच ‘मला सासू हवी’ या मालिकेतल्या ऋषी या भूमिकेची. करताना छानही वाटलं, मोठी भूमिका पहिल्यांदाच मिळाली होती. मग सोबतच झी मराठी अ‍ॅवॉर्ड्सला नामांकन, त्यात डान्स परफॉर्मन्स हे सगळं अनुभवता आलं. खूपच वेगळा अनुभव होता तो. या मालिकेचं शूट चालू असतानाच दिग्दर्शक मंगेश कदमांचा फोन आला आणि मला माझं तिसरं व्यावसायिक आणि आत्तापर्यंत मी केलेलं सर्वोत्तम नाटक मिळालं ‘वैशाली कॉटेज’. कमाल नाटक, प्रयोगही प्रभावी व्हायचा. त्यात मला दोन भूमिका असल्याने मजा यायची.  शूट आणि प्रयोग असं दोन्ही एकत्र मी करायला लागलो, भारीच वाटायचं. पण, निर्मात्याच्या बेजबाबदारपणामुळे हे नाटक ९८ प्रयोगांत बंद करावं लागलं. आम्हाला सगळ्यांना फार वाईट वाटलं. इकडे ‘मला सासू हवी’चा शेवट जवळ आला होता. परत अस्वस्थता की, आता काय.? उत्तरही लग्गेच मिळालं, तेही झी मराठी कडूनच ते म्हणजे; ‘आम्ही सारे खवय्ये.’. २०१२ पासून आजपर्यंत मी हा कार्यक्रम करतोय. मला या कार्यक्रमानं माणूस म्हणून खूप श्रीमंत केलं. महाराष्ट्रभरात मी कुठेही उपाशी राहणार नाही इतक्या ताई, माई, मावश्या, आज्या, काकू माझ्या आयुष्यात आणल्या. हा कार्यक्रम मी करायला लागलो आणि दोन-चार महिन्यांत मला ‘फू बाई फू’साठी विचारण्यात आलं. एखादी विनोदी भूमिका करणं वेगळं आणि या कार्यक्रमांसारख्या विनोदाच्या पुरांत स्वत:ला अजमावणं वेगळं. मी ते केलं, पण प्रामाणिकपणे सांगतो मला ते फारसं जमलं नाही. स्किट लिखाणाचे, सादरीकरणाचे प्रयत्न मी मनापासून केले, पण ते बरे होते, उत्तम नाही.

ते पर्व झालं आणि माझ्या आयुष्यात माझं चौथं व्यावसायिक नाटक आलं ‘बेगम मेमरी आठवण गुलाम’. या नाटकात मला तीन वेगवेगळ्या वयाच्या भूमिका होत्या. चांगल्या झाल्या असाव्या म्हणूनच मला त्या वर्षीच्या ‘झी गौरव, मटा सन्मान, मिफ्टा’ सगळीकडे नामांकन मिळालं. आणि मिफ्टामुळे पहिल्यांदा परदेशात जाता आलं. पण दुर्दैव पाहा, हेही नाटक ३५ प्रयोगांत तीन निर्माते बदलूनही बंदच पडलं.

या सगळ्या २००८ पासूनच्या प्रवासामध्ये मी एकदा महेश मांजरेकर यांच्या घरी गेलो. त्यांच्या नावे पत्र ठेवलं की, ‘मी ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’मध्ये होतो, तिथे तुम्हाला माझं काम आवडायचं, वाटलं तर मला सिनेमात घ्या’. वाटलंही नव्हतं प्रतिसाद येईल. पण त्यांच्या असिस्टंटचा थेट सिनेमासाठी फोन आला आणि मी ‘कोकणस्थ’ नावाचा सिनेमा केला. प्रमुख भूमिका नव्हती, पण महत्त्वाची नक्कीच होती. ते काम आवडलं म्हणून मांजरेकरांनी मला ‘काकस्पर्श’च्या िहदी आणि तमिळ रिमेकमध्येही घेतलं. मोठय़ा मोठय़ा अभिनेत्यांसोबत काम करायला मिळालं. खूपच छान वाटलं. पण यातला एकही सिनेमा मांजरेकरांच्या इतर सिनेमांइतका गाजला नाही.

त्यानंतर मी एकदा ‘हवा येऊ द्या’मध्ये कविता सादर केली होती. त्यातलं माझं सादरीकरण, वावर पाहून नागपूरच्या एका लेखक-दिग्दर्शकाने मला ‘नागपूर अधिवेशन’ नावाच्या सिनेमासाठी प्रमुख भूमिकेत घेतलं. मी काम उत्तम केलं. मोहन जोशी, मकरंद अनासपुरे यांच्यासोबत काम करता आलं. पण सिनेमा फारसा चालला नाही.

मला नगरच्या एका लेखक-दिग्दर्शकाने ‘भॉ’ नावाच्या सिनेमात प्रमुख भूमिकेत घेतलं. त्यामुळे अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये मला उत्कृष्ट अभिनेत्याचं बक्षीस मिळालं, पण अजूनही तो सिनेमा प्रदर्शित झालेला नाही. वर्षभरापूर्वी मी ‘खोपा’ नावाच्या सिनेमात प्रमुख भूमिका केली. तोही बरा होता, मी काम बरं केलं, पण तोही  यशस्वी नाही झाला.

या सगळ्यात सतत माझ्यासोबत होतं ‘आम्ही सारे खवय्ये’ म्हणजेच ‘झी मराठी’. आणि म्हणूनच मी या वाहिनीला माझी ‘गॉडमदर’ म्हणतो. मी पडद्यावर दिसत नव्हतो तेव्हाही याच वाहिनीचे इव्हेंट्स करून, सोहळ्यांच्या आधीचे पूर्वरंग करून, सणावारांत शूट होणारे शोज करून मी कामांत व्यग्र राहिलो.

अगदी अलीकडे मला झी मराठी वाहिनीवरच ‘खुलता कळी खुलेना’ ही मालिका मिळाली. भूमिका दोन महिनेच असणार होती हे माहीत होतं. पण भट्टी कमाल जमली. काम उत्तम झालं. इतकं की, देशा-परदेशांत माझ्या कामाचं, गाण्याचं कौतुक करणारे मेल्स, मेसेजेस मला आले.

ही भूमिका झाली आणि मला प्रशांत दामलेंसोबत ‘साखर खाल्लेला माणूस’ हे पाचवं व्यावसायिक नाटक मिळालं. त्याचे गेल्या वर्षभरात दहा देशांत प्रयोग केले आणि प्रयोगसंख्या ३५०. हुश्श्श्श!! पहिलंच चाललेलं नाटक, ज्याचा मी भाग आहे. बरं वाटतंय. हे नाटक करीत असतानाच ‘खुलता कळी खुलेना’मधलं काम पाहून ‘देवाशप्पथ’ मालिका मिळाली झी युवावर. ती आता पूर्ण होत आलीये. परत कमाल अनुभव, खूप समाधान.

हे सगळं करीत असताना मधल्या गॅपमध्ये मी अजिबात थांबलो नाही. प्रयोगांना जाऊन दिग्दर्शकांना भेटणं, मला काम द्या म्हणणं, इव्हेंट्स लिहिणं, कविता करणं, संधी मिळाली कीती योग्य ठिकाणी सादर करणं, ऑडिशन्स देणं, खासगी कार्यक्रम, निवेदन करणं असा सतत कामासाठी आणि कामात धडपडलो आणि आजही धडपडतोय. गेले सहा महिने तर नाटकाचे प्रयोग, मालिका आणि खवय्ये हे तिन्ही करताना प्रचंड तारांबळ झालीये. पण मी याचसाठी मुंबईत आलोय, मला आयुष्यभर अशीच व्यस्तता हवीये. यात माझं कुटुंब सतत मला समजून घेत आलंय.

आता ‘देवाशप्पथ’नंतर पुढे काय हा प्रश्न आहेच! पण कामातून काम मिळतं. ते टिकवावं लागतं. त्या सातत्यातही नावीन्य कायम ठेवावंच लागतं, पडेल ते नाही, परंतु सगळं करायची तयारी ठेवावी लागते. कलाकारासारखंच कलाकृतीतही नशीब असतं. तुमचं उत्तम काम लोकांपर्यंत पोहोचायला नियतीने ठरवलेला वेळ लागणारच आहे. प्रत्येक काम कुठला तरी निर्माता, दिग्दर्शक पाहतोय हे मनात ठेवूनच करावं लागतं. त्यामुळे अनिश्चितता असली तरीही अस्थैर्य नाहीये.

या सगळ्या प्रवासात मला माध्यमं, संस्था, सहकलाकार आणि मायबाप प्रेक्षकहो तुम्ही स्वीकारलंत, ओळख दिलीत, आभारी आहे. पण प्रवास मोठा आहे! आत्ता तर सुरू झालाय; सोबत राहा.. मी मेहनतीला कमी पडणार नाही..!!
सौजन्य – लोकप्रभा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2018 1:02 am

Web Title: sankarshan karhade article celebrity writer
Next Stories
1 Video : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते….
2 शाहरुख मुस्लीम की हिंदू ? गणेशभक्त अबरामवरुन ट्रोलर्सचा सवाल
3 वरूण-अनुष्काची स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून निवड
Just Now!
X