सिनेमा
अर्जुन नलवडे – response.lokprabha@expressindia.com

सामान्य माणसाला त्याच्या आयुष्यात सहजपणे जे पाहायला-अनुभवयाला मिळत नाही, ते पाहण्यासाठी तो सिनेमागृहात जातो. चित्रपटातल्या नायकाच्या जागी स्वतला ठेवतो अन् त्या आभासी विश्वात हरवून जातो. त्यामुळे चित्रपटाच्या माध्यमातून त्याच्यासमोर पुन्हा त्याचेच जगणे ठेवणे हे धोका पत्करणारे मोठे धाडसच म्हणावे लागेल. त्यासाठी प्रेक्षकांची मानसिकता तयार करून त्यांची उत्सुकता वाढविणे आणि मग असा चित्रपट त्यांच्यासमोर ठेवणे हे वेगळे कसबच. ते दाखविले आहे ‘कोरी पाटी प्रॉडक्शन’च्या टीमने. या प्रॉडक्शनतर्फे नुकताच ‘संतुर्की.. गोष्ट संत्या- सुरकीची’ नावाचा पहिला मराठी वेबसिनेमा यू-टय़ूबवर आला आहे. ‘गावाकडच्या गोष्टी’ या वेबसीरिजने हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची मानसिकता आधीच तयार करून ठेवली होती. तिचे खतपाणी या चित्रपटाला मिळेल अशी अपेक्षा आहे.

खरे तर आज प्रत्येकजण गाव सोडून कामासाठी शहरात येत आहे. मिळेल ते काम करत जगत आहे. तिथल्या धकाधकीच्या जगण्यात गावाकडची आठवण नक्कीच येत असते. मग, शहरात राहून गावात असल्याची भावना प्रत्येक स्थलांतरित व्यक्तीच्या मनात निर्माण करता येईल का, या विचारांतून ‘गावाकडच्या गोष्टी’ या वेबसीरिजने जन्म घेतला आणि पाहता पाहता ‘कोरी पाटी प्रॉडक्शन’ने पाच लाख ८७ हजार यू-टय़ूब सबस्क्रायबर मिळवले. ‘गावाकडच्या गोष्टी’ वेबसीरिजची दोन पर्व झाल्यानंतर प्रेक्षकांचा मिळत जाणारा प्रचंड प्रतिसाद आणि संत्या-सुरकीच्या (संतोष आणि सुरेखा) प्रेमाची गोष्ट जाणून घेण्याची लागलेली उत्सुकता यातून ‘संतुर्की’ हा पहिला मराठी वेबसिनेमा आकाराला आला. दोन तासांचा चित्रपट काढणे, त्यासाठी आर्थिक गणिते  ही खरे तर तारेवरची कसरत असते. मात्र, प्रत्येकाच्या हातात आलेला फोर-जी मोबाइल आणि त्यात आलेले विविध व्हिडीओ अ‍ॅप्स यातून आपण लाखो-करोडो प्रेक्षकांपर्यंत सहज पोहचू शकतो. यातच या चित्रपटाचं यश दडलेले आहे.

तुमची कलाकृती चांगली असेल आणि लोकांच्या पंसतीला तुम्ही उतरला असाल, तर मुख्य प्रवाहात तुम्ही नसलात तरी काही फरक पडत नाही. लोक आपोआपच तुम्हाला डोक्यावर घेतात. कारण तुम्ही त्यांच्या मनातले बोलता. असेच या चित्रपटातून दिग्दर्शकाने दाखवून दिलेले आहे. आता प्रश्न असा उपस्थित होतो की, लाखो रुपये खर्च करून निर्माण केलेला चित्रपट प्रेक्षकांना यू-टय़ूबवर विनामूल्य उपलब्ध करून देण्यात काय हशील आहे? तर प्रेक्षकांनी वेबसीरिजला यू-टय़ूबवर भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्यातून यू-टय़ूबकडून आलेल्या जाहिराती आणि हिंदुस्तान फिड्सकडून मिळालेले प्रायोजकत्व याच्या जोरावर ‘संतुर्की’ प्रेक्षकांना विनामूल्य देणे ही आवाक्यातील गोष्ट झाली. त्याचबरोबर इतर चित्रपटांसारखे महागडे कलाकार, त्यांचा मेकअप, महागडे ड्रेसेस, चकचकीत सेट्स यांवरचा खर्च ‘संतुर्की’मध्ये दिसत नाही आणि याच ‘साधेपणा’मुळे चित्रपटाचा खर्च कमी झाला असावा, ज्यातून हा चित्रपट प्रेक्षकांना विनामूल्य दाखविणे ‘कोरी पाटी’ प्रॉडक्शनला शक्य झाले असावे.

‘संतुर्की’ चित्रपटाला सामाजिक, आर्थिक, भावनिक, राजकीय, पारंपरिक, कौटुंबिक असे अनेक पदर आहेत. साधारणपणे प्रत्येक चित्रपटाचा शेवट हा ‘हॅप्पी’ असतो. त्यालाच यामध्ये फाटा दिलेला आहे. मनापासून प्रेम  केले असेल, तर सोबत राहिलंच पाहिजे असं नाही. दोन वेगवेगळ्या ठिकाणी, वेगळ्या कुटुंबांत, वेगळ्या नात्यांमध्ये राहूनदेखील प्रेम करता येतं. त्याचबरोबर गलिच्छ राजकारणामुळे घरादारासोबत आपल्या प्रेमालाही मुकावे लागते, असा संदेश चित्रपटातून देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच बेकारीचा अनुभव, शाळेतला राडा, वर्गातल्या मुलीवरच्या प्रेमात मित्रांनी दिलेली साथ, गावातल्या राजकारणात युवकांचे नुकसान, भौतिक सुविधांकडे पाहून गावातल्या मुलींची केली जाणारी लग्ने आदी विषय ‘संतुर्की’ या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न बऱ्यापैकी साध्य झाला आहे.
सौजन्य – लोकप्रभा