हरियाणा येथील सुप्रसिद्ध नृत्यांगना सपना चौधरीच्या ‘हरियाणवी नाइट’ कार्यक्रमात गोंधळ झाल्याने आयोजकांवर कार्यक्रम अर्ध्यात थांबवण्याची वेळ आली. कार्यक्रम सुरु असताना काहीजण सुरक्षा भेदत मंचापर्यंत पोहोचले होते. त्यांना नियंत्रणात आणताना पोलिसांसोबत धक्काबुक्की होऊ लागली होती. अखेर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. गोंधळ वाढू लागल्याने सपना चौधरीने अर्ध्यातच कार्यक्रम थांबवला.

सपना चौधरीच्या कार्यक्रमात नेहमची प्रेक्षकांची गर्दी असते. प्रेक्षकांना आवरण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्तही त्याच प्रमाणात असतो. याआधी बिहारमधील बेगुसराय येथे सपना चौधरीच्या कार्यक्रमादरम्यान गोंधळ उडाला होता. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू झाला होता.

अशाच पद्धतीने सपना चौधरीची एक झलक पाहण्यासाठी आणि फोटो घेण्यासाठी प्रेक्षक, चाहते अनावर झाले होते. यासाठी काहीजण सुरक्षा भेदत मंचापर्यंत पोहोचले होते. पोलीस आणि आयोजकांनी समजावण्याचा प्रयत्न करुनही प्रेक्षक ऐकण्यास तयार नव्हते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला. यामध्ये काहीजण जखमीदेखील झाले. अखेर कार्यक्रम थांबवण्याची धमकी देत लोकांना शांत करावं लागलं. यानंतर मंचासमोर पोलिसांना तैनात करत पुन्हा कार्यक्रम सुरु कऱण्यात आला.

पण काहीवेळाने पुन्हा एकदा धक्का-बुक्की सुरु झाली. यानंतर सपना चौधरीला आराम करण्यासाठी बॅक स्टेज पाठवण्यात आलं. सपना चौधरी पुन्हा येऊन कार्यक्रम सुरु होईल अशी अपेक्षा प्रेक्षक करत होते. पण सपना चौधरी परतलीच नाही आणि कार्यक्रम थांबवावा लागला.