अभिनेत्री करिना कपूर खान आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमुर सोशल मीडियावर किती प्रसिद्ध आहे हे सर्वांनाच माहित आहे. एखाद्या स्टारप्रमाणेच त्याचं स्टारडम आहे. पण हाच स्टारडम त्याच्या कुटुंबीयांसाठी चिंतेचा विषय ठरतोय. दोन वर्षांचा तैमुर नेहमीच फोटोग्राफर्सनी वेढलेला असतो आणि दररोज त्याचे फोटो, व्हिडिओ व्हायरल होत असतात.

प्रसारमाध्यमे आणि फोटोग्राफर्सनी तैमुरला इतकं कव्हरेज देऊ नये. या सगळ्या गोष्टींसाठी तो खूप लहान आहे, अशी चिंता शर्मिला टागोर यांनी व्यक्त केली. ‘हॉल ऑफ फेम अवॉर्ड्स २०१९’दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या पुढे म्हणाल्या, ‘आम्हाला आता त्या गोष्टींना मान्य करूनच चालावं लागेल. हा काळ सोशल मीडियाचा आहे. त्यावर काहीच करू शकत नाही. मी थोडी जुन्या विचारसरणीची आहे. लहान मुलांना अशाप्रकारे प्रसिद्धीझोतात आणणं मला पटत नाही.’

वाचा : भन्साळींच्या ‘ईन्शाल्ला’ चित्रपटात सलमान-आलिया 

या सर्व गोष्टींना कशाप्रकारे सामोरं जायचं याबद्दल साराने मला उत्तम सल्ला दिला असंही त्यांनी सांगितलं. ‘तुम्ही जर त्यांना हरवू शकत नाही, तर त्यांच्यात सामील व्हा, हा महत्त्वाचा कानमंत्र मला साराने दिला.’

इतर स्टारकिड्सच्या तुलनेत तैमुर सर्वाधिक प्रकाशझोतात असतो. याआधी करिनानेही याविषयी चिंता व्यक्त केली होती. सोशल मीडियावर त्याच्याबद्दल अनेक गोष्टी लिहिल्या जातात तर क्षणार्धात त्याचे सुंदर फोटो व्हायरल होतात. तैमुरच्या एका फोटोसाठी फोटोग्राफर्स १५०० रुपये आकारतात असं खुद्द सैफ अली खानने सांगितलं होतं. इतकंच नव्हे तर ही रक्कम कोणत्याही बॉलिवूड सेलिब्रिटीपेक्षा जास्त असल्याचंही त्याने सांगितलं होतं.