सैफ अली खानची मुलगी सारा अली खानच्या पदार्पणाच्या चित्रपटावर एकानंतर एक संकट येऊ लागले आहेत. एकीकडे दिग्दर्शक अभिषेक कपूर आणि क्रीअर्ज एंटरटेन्मेंट यांच्यामधील वाद टोकाला गेले असतानाच आता क्रीअर्जची निर्माती प्रेरणा अरोराने कोर्टात धाव घेतली आहे. या वादाचा परिणाम चित्रपटावर होत असून त्याचे शूटिंगही थांबवण्यात आले आहे.

एकीकडे क्रीअर्ज एंटरटेन्मेंटच्या प्रेरणा अरोराने दिग्दर्शक अभिषेकच्या गैरव्यवस्थान आणि चुकीच्या कामाच्या पद्धतीमुळे प्रदर्शन लांबणीवर जात असल्याचा आरोप केला. तर दुसरीकडे आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत क्रीअर्ज पारदर्शक नसल्याचा ठपका अभिषेकने ठेवला आहे. याप्रकरणी आता मुंबई हायकोर्टात धाव घेणार असल्याचे प्रेरणा अरोराने स्पष्ट केले.

PHOTO : ‘खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनों’

‘हा वाद लवकरच मिटेल अशी आशा आहे. याप्रकरणी आता आम्ही हायकोर्टाची मदत घेणार आहोत. ‘केदारनाथ’ चित्रपट माझ्या निर्मिती संस्थेशी निगडीत असून हा आमचाच चित्रपट आहे,’ अशी प्रतिक्रिया प्रेरणाने दिली. ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ आणि ‘पॅडमॅन’ या चित्रपटांपासून प्रेरणा अरोराचा क्रीअर्ज एंटरटेन्मेंट प्रकाशझोतात आला. आगामी ‘बत्ती गुल मीटर चालू’ या चित्रपटाची निर्मितीही क्रीअर्ज करत आहे. एकीकडे साराच्या पदापर्णाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत असताना हा वाद निर्माण झाल्याने चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सारासोबत या चित्रपटात सुशांत सिंह राजपूत मुख्य भूमिका साकारणार आहे.