अमेरिकेत पोलिसांच्या कारवाईत ४६ वर्षीय कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूनंतर संतापाची लाट उसळली आहे. अमेरिकेसह जगभरात या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. सोशल मीडियावरदेखील हे प्रकरण चांगलंच पेटलं आहे. त्यातच हॉलिवूड कलाकारांसोबत काही बॉलिवूड कलाकारांनीही या घटनेचा निषेध केला आहे. मात्र या घटनेचा निषेध करणारी एक पोस्ट शेअर केल्यामुळे अभिनेत्री सारा अली खान हिच्यावर ट्रोल होण्याची वेळ आली आहे.

जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर ‘Black Lives Matter’ ही मोहिम जोर धरु लागली आहे. अनेकांनी या मोहिमेला पाठिंबा दिला आहे. यामध्येच सारा अली खाननेदेखील इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. मात्र या पोस्टमध्ये तिने एक बदल केल्यामुळे तिला ट्रोल व्हावं लागलं आहे. विशेष म्हणजे साराचं ट्रोलिंग सुरु झाल्यानंतर तिने लगेचच ही पोस्ट डिलीट केली.

साराने शेअर केलेल्या पोस्टमध्ये ‘ब्लॅक’ हा शब्द खोडून त्यावर ‘ऑल लाइव्स’ असं लिहिलं होतं. तिने शेअर केलेला हा फोटो पाहून अनेकांनी तिला खडे बोल सुनावले आहेत. “प्रत्येक गोष्टीत मस्करी करणं योग्य नाही”, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर “जर तुला नीट माहिती नसेल तर त्याविषयी बोलणं बरोबर नाही”, असं अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर साराच्या या पोस्टची चांगलीच चर्चा रंगली आहे.

दरम्यान, जॉर्ज फ्लॉयड या आफ्रिकन वंशाच्या व्यक्तीचा मिनियापोलिस शहरातील पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेत हिंसक पडसाद उमटत आहेत. अमेरिकेतील वेगवेगळया शहरांमध्ये हिंसाचार, दंगली झाल्याचं पाहायला मिळालं. तसंच शेकडोंच्या संख्येने लोकांनी व्हाइट हाऊसबाहेर निदर्शनेही केली.